ठाणे : भविष्यात जागतिक तापमानवाढीचा राक्षक जगा समोर उभा आहे. प्रत्येकाने वृक्ष लावून ते जगविले पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. जितके पर्यावरणपुरक करता येईल, ते सर्व केले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिला. ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करत आहोत, आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे असेही ते म्हणाले.
वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ठाणे महापालिकेने एक एकरच्या क्षेत्रात सेंद्रीय भाजीपाला पिकवावा. नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील. अशाप्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल, अशी सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात दीड लाख झाले लावली. यावर्षी ती संख्या दोन लाखावर नेण्यात यावी. पुढील वर्षी आणखी वाढवावी, असेही शिंदे यांनी सांगितले.
बांबू लागवड, प्राणवायू उद्यान, तलावांचे सुशोभिकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे. अतिक्रमण झालेला जोगिला तलाव पूर्ववत करण्याचे काम ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करून पूर्ण भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचे मोठे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले यांची पाहणी केली. भातशेती, गावातील घराची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, विविध प्रकारचे स्टॉल यांचीही पाहणी त्यांनी केली.