ठाणे : राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका यासाठी काळजी घ्या, अशा स्पष्ट सूचना देत, एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग, मी तुमची काळजी घेईन, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील बिझनेस जत्रेत बोलताना उद्योग मंत्र्यांना दिला.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीने आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. एका उद्योगामुळे अनेक लघु उद्योजकांना काम मिळते. यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते. यामुळे उद्योग हे राज्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे अडीच वर्षात काय झाले, याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना उद्योग मंत्र्यांना दिल्या आहेत. तसेच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग, मी तुमची काळजी घेईन, असा इशाराही दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>> सराफाच्या दुकानातील कामागाराची हत्या करणाऱ्यास उत्तरप्रदेशातून अटक, दोन आरोपींचा शोध सुरू
महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. मी मुख्यमंत्री झाल्यावर आता परकीय गुंतवणूकित आपले राज्य क्रमांक एकवर आले. पूर्वी उद्योजकाना माझे काय म्हणून विचारले जायचे. आता आम्ही त्यांना तुमचे काय म्हणून विचारतो.असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग, मंदिर, दुकान, सण, उत्सव बंद होते. सगळे बंद करून चालणार कसे, नुसते करोना करून चालत नव्हते. यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारेचे सरकार स्थापन केले, असेही ते म्हणाले. मागील अडीच वर्षात विविध क्षेत्रात काम झाले. आपले राज्य उद्योगस्नेही राज्य झाले आहे, असेही ते म्हणाले. व्यवसाय कोणताही असो, त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यातू विश्व निर्माण होते. संधीचे सोने केले पाहिजे. असे केल्यास त्या व्यक्तीला निश्चित यश मिळते असे मतही त्यांनी व्यक्त केले.