ठाणे : राज्य सरकारने अडीच वर्षांत विकासकामे केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला कामाची पोचपावती दिली. जनतेच्या न्यायालयात जोतो म्हणाऱ्यांना निवडणुकीत जनतेने कायमचे घरी बसविले आहे, तसेच धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिक्कामोर्तब झाला आहे अशी टिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.
टेंभीनाका येथील आनंद आश्रमात रविवारी ठाकरे गटासह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांनी विरोधकांवर टिका केली. मागील अडीच वर्ष आम्ही काम केले. नागरिकांनी आम्हाला कामाची पोचपावती दिली. निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळाले. जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि धनुष्यबाण यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यातून पक्ष प्रवेश होत आहेत असे शिंदे म्हणाले. अडीच वर्ष शिव्या श्राप देणाऱ्यांचे तोंड जनतेने बंद केले आहे. यापूर्वी निवडणुक आयोग, सर्वोच्च न्यायालयावर आरोप करणाऱ्यांना आणि जनतेच्या न्यायालयात जातो म्हणाणाऱ्यांना जनतेने कायमचे घरी बसविले आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन ही शिवसेना कार्य करत आहे. राज्यात विकासाचा रथ अधिक वेगाने धावेल असेही शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा…नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
नवी मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला नवी मुंबईत मोठे खिंडार पडले. तर धुळे, पालघर, मुरबाड भागातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.