लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहराच्या जडण-घडणीत सतीश प्रधान यांचे मोठे योगदान आणि सहकार्य होते. त्यांनी नगराध्यक्ष असो वा महापौर जी पदे मिळाली. त्या पदांचा उपयोग ठाणे शहराच्या विकासासाठी केला. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शिंदे यांच्या निर्देशानुसार सतीश प्रधान यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
माजी खासदार सतीश प्रधान (८५) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव ज्ञानसाधना महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सतीश प्रधान यांचे निधन आमच्यासाठी दु:खद आणि वेदनादायी घटना आहे. त्यांनी अनेक पदे भूषविली. शिवसेनेच्या पहिल्या फळीतले ते नेते होते. कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. या शहराचे मानबिंदू असलेले गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले असे शिंदे म्हणाले. ठाणे शहराच्या जडण-घडणीत त्यांचे मोठे योगदान आणि सहकार्य होते. त्यांनी नगराध्यक्ष असो वा महापौर जी पदे मिळाली. त्या पदांचा उपयोग ठाणे शहराच्या विकासासाठी केला.
आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर कारला आग, महामार्गावर वाहतुक कोंडी
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रधान यांचा सर्वच क्षेत्रात सहभाग होता. ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली. अतिशय दुर्गम भागातील तरुण-तरुणींना या मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यासपीठ सुरू करुन दिले. ठाणे महापौर वर्षा मॅरेथाॅनमध्ये धावलेले तरुण पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले. साहित्य क्षेत्रातही त्यांनी अनेक उपक्रम घेतले. ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे असेही शिंदे म्हणाले. कारसेवा त्यांनी केली. ते या प्रकरणात काही दिवसांपूर्वी निर्दोष सुटले होते. बाळासाहेबांच्या कडवट आणि हिंदूत्त्वाचा विचार पुढे नेणारे सतीश प्रधान होते असेही शिंदे म्हणाले.