ठाणे : काही लोक मला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. परंतु माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शनिवारी ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एकनाथ पर्व – आपला लाडका भाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

काही लोक मला बदनाम करण्याचा कट कारस्थान रचत आहेत. परंतु माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मी चार भिंतीत रमणारा नाही. तर कामामध्ये आणि लोकांच्या सेवेत रमणारा आहे असे शिंदे म्हणाले. माझ्या अडीच वर्षांच्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली. मी कर्तव्य म्हणून काम केले. ‘एकनाथ पर्व’ हे विकासाचे, महाराष्ट्रातल्या समृद्धीचे पर्व होते असेही ते म्हणाले. राज्याचे महत्त्वाचे पद भूषवित असतानाही मी पायाला भिंगरी लावून फिरलो. अडीच वर्षात प्रचंड कामे केली. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना राबविल्या. सर्वसामान्यांच्या कुटुंबाची ओढाताण काय होते मी पाहिले आहे. त्यामुळे मी लाडकी बहिण योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या गावी मी शेती केली. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. परंतु गावी गेल्यावर बातम्या सुरु होतात, एकनाथ शिंदे नाराज आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. ठाणे हे माझे जीवाचे प्राण आहे. माझ्यात कधीही बदल होणार नाही. कारण दिवंगत आनंद दिघे यांच्या मुशीत मी घडलो आहे. आज ठाण्याचा विकास होत आहे. काही प्रकल्प, योजना ठाण्यात सुरु झाले. त्यानंतर हे प्रकल्प राज्यात सुरू झाल्याचेही ते म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. शिवसेना वाचविण्यासाठी मी धाडस केले. आता राज्याला पुढे नेण्याचे काम करायचे आहे. आम्ही शासन आपल्या दारी योजना राबविली. जिथे संकट असते. तिथे मी पोहचतो. विरोधकांनी सर्व प्रकल्पांना विरोध केला होता. परंतु मी या विरोधकांचा विरोध मोडून काढला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांना सवंगडी समत होते. परंतु आताचे लोक कार्यकर्त्यांना घरगडी समजत होते असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

Story img Loader