ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्वच शहरांचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले आहे. नागरीकरणाबरोबरच वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे शहरांमधील अनेक भागांत अगदी छोटय़ा-छोटय़ा कारणांमुळे वाहतूक कोंडी होते. या छोटय़ा समस्या दूर केल्यानंतर त्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघू शकतो. नेमक्या या सर्व बाबी लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरांमधील वाहतूक व्यवस्थेचा बारकाईने अभ्यास करून नव्याने वाहतुकीचे नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वाहतूक कोंडीची नेमकी कोणती कारणे आहेत आणि ही कोंडी भेदण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नवे नियोजन नेमके कसे असेल, याविषयी ठाणे वाहतूक विभागाचे नवे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिलेली ही विशेष मुलाखत..
संदीप पालवे – पोलीस उपायुक्त (वाहतूक) ठाणे

* वाहतूक शाखेपुढे सर्वात मोठे कोणते आव्हान आहे?

ठाणे पोलीस दलात काही महिन्यांपूर्वी रुजू झाल्यानंतर नाशिकला तसेच मुंबईला कामानिमित्त जाताना घोडबंदर मार्गावरील तसेच शहरातील वाहतूक कोंडीचा अनुभव आला होता. तसेच जून महिन्याच्या अखेरीस वाहतूक शाखेचा पदभार हाती घेतल्यानंतर शहरांमध्ये वाहतूक कोंडी हीच प्रमुख समस्या असल्याची बाब निदर्शनास आली. वाहनांची मोठी संख्या आणि त्या तुलनेत अपुरे रस्ते यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान वाहतूक शाखेपुढे आहे.
* ठाण्यातील कोंडीची प्रमुख कारणे कोणती?
मुंबई शहरामध्ये वाहनांचा आकडा मोठा आहे पण, ही सर्व वाहने कार, जीप अशा स्वरूपाची आहेत. तसेच मुंबईत मार्गिकेसाठी असलेले नियम पाळले जातात. अवजड वाहने डाव्या बाजूनेच वाहतूक करतात. राज्य गुप्त वार्ता विभागात असताना मुंबई शहरात दोन वर्षे काम केले. त्या वेळी ही बाब निदर्शनास आली. मुंबईप्रमाणेच ठाण्यात वाहनांचा आकडा मोठा आहे, पण त्यात अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनांच्या तुलनेत मात्र अरुंद रस्ते आहेत. तसेच ठाण्यात मार्गिकेची शिस्त पाळली जात नाही. अवजड वाहने डाव्याऐवजी कोणत्याही मार्गिकेतून वाहतूक करतात. त्यामुळे अरुंद रस्ते, वाहनांचा मोठा आकडा आणि बेशिस्त चालक अशी प्रमुख कारणे वाहतूक कोंडीस कारणीभूत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरांमधील अनेक भागांत अगदी छोटय़ा-छोटय़ा कारणांमुळे वाहतूक कोंडी होते. या छोटय़ा समस्या दूर करून त्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
* वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे?
अरुंद रस्ते, वाहनांचा मोठा आकडा आणि बेशिस्त चालक ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे असल्यामुळे त्यासाठी उपाययोजना आखल्या जातात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरात अवजड (सहा चाकीपेक्षा जास्त) वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना कामावर जाताना आणि घरी परतताना कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ही वाहने शहराबाहेरील महमार्गावर उभी राहिली तर कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोंडीत अडकून पडावे लागू शकते. त्यामुळे या वाहनांना दुपारच्या वेळेत शहरातून प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. याशिवाय, अवजड वाहतुकीला रात्रीच्या वेळेस केवळ शहरात प्रवेश दिला तर या वाहनांचे चालक या वेळेत वेगाने वाहने चालवतील आणि त्यामुळे वाहनांचा अपघात होऊ दुर्घटना घडू शकते. हे सर्व टाळण्यासाठीच दुपारच्या वेळेत त्यांना वाहन चालविण्याची मुभा दिली आहे.
* शहरातील रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावेत म्हणून कोणते नियोजन आहे?
ठाणे शहरामधील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण नुकतेच करण्यात आले आहे. काही भागांत मात्र रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नाही. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा वापर वाहतुकीसाठी कसा करता येईल, याचा विचार करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा वाहने उभी असतात. ही बेकायदा पार्किंग हटवून वाहतुकीस रस्ता मोकळा ठेवणे. तसेच कळवा खाडीवर तिसरा पूल उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी विटावा आणि साकेत भागात रस्त्याच्या मधोमध पत्रे लावण्यात आले आहेत. मात्र, या कामाच्या आवश्यकतेपेक्षा जास्त जागा पत्रे लावून व्यापण्यात आली आहे. त्यामुळे हे पत्र्याचे कुंपण आतमध्ये घेण्यास सांगून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. ठाणे शहरातील तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू आहेत. त्या ठिकाणीही अशा प्रकारे पत्र्याचे कुंपण आतमध्ये घेण्यास सांगितले आहे. याशिवाय, मुख्य रस्त्याच्या कडेचा रस्ता तयार करण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जेणेकरून या भागातून दुचाकी तरी जाऊ शकतील.
* बेशिस्त चालकांना शिस्त लावणार म्हणजे नेमके काय करणार?
शहरातील बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यापूर्वी आमचा वाहतूक विभाग काम किती गंभीर्याने करतो आहे, हे दाखविणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लावणे, वाहतूक यंत्रणा तत्पर करणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आदीचा समावेश आहे. यामुळे शहरातील वाहतुकीस काहीशी शिस्त लागेल. अवजड वाहने डाव्या बाजूनेच जातील तसेच शहरातील रस्ते वाहतुकीस खुले राहतील, या दिशेने काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नियमांचे पालन करणाऱ्या चालकांचे कौतुक करण्यासाठी थँक्यू इंडियाची मोहीम पुढेही सुरू ठेवणार आहे. मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम कमी आहे पण, महापालिकेच्या नियमावलीत दंडाची रक्कम मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेच्या नियमावलीची अंमलबजावणी शहरात आणखी प्रभावीपणे करण्याचा विचार आहे.
नीलेश पानमंद