भगवान मंडलिक
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कचरा समस्या कायमची संपुष्टात आणण्यासाठी गेल्या अडीच वर्षापासून टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, २७ गाव हद्दीत पहाटे पाच वाजल्या पासून ते रात्री उशिरापर्यंत नियमित भ्रमंती करणारे कल्याण डोंबिवली पालिकेचे घनकचरा विभागाचे तत्कालीन उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांची लातुर येथे बदली झाली आहे. हे अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे डोंबिवली,कल्याण मधील अनेक नागरिक सकाळीच घर परिसरात, रस्त्यावर कोठे कचरा दिसला की थेट डॉ. कोकरे यांना साहेब अमुक ठिकाणी कचरा पडला आहे, असे सांगून कामगारांना कचरा उचलण्यासाठी आदेश देण्याची मागणी करत आहेत.
हेही वाचा – डोंबिवली : …अन् शिळफाटा मार्गावर शेतकरी संघटनेने ‘लोकसत्ता’मधील बातमीचे लावले फलक
कल्याण डोंबिवली पालिकेतून दोन महिन्यापूर्वी उपायुक्त कोकरे यांची लातुर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका प्रशासन विभागात सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे. हे कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांना माहिती नसल्याने ते रहिवासी थेट कोकरे यांच्याकडे कचऱ्याची तक्रार करत आहेत. कल्याण डोंबिवलीतून दररोज उपायुक्त कोकरे यांना १५ ते २० नागरिक मोबाईलवर संपर्क करुन त्यांना कचरा समस्ये विषयी तक्रारी करत आहेत. स्वत उपायुक्त कोकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठी उपायुक्त कोकरे स्वता पहाटे पासून शहराच्या विविध भागात फिरायचे. कामगार, आरोग्य अधिकारी वेळेवर येतात की नाही. सोसायटीच्या आवारातील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून व्यवस्थित उचलला जातो की नाही याची पाहणी करायचे. सकाळीच शहराच्या विविध भागात भ्रमंती करायची नंतर कार्यालयीन काम आणि रात्री ११ नंतर संपर्क केलेल्या नागरिकांना प्रतिसाद देऊन त्यांच्या कचरा विषयक तक्रारी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे, असा कोकरे यांचा दिनक्रम होता.
सामान्य नागरिकांच्या तक्रारीची उपायुक्त कोकरे यांच्याकडून दखल घेतली जात होती. एवढा मोठा अधिकारी पण आपले फोन पटकन उचलतो याचे रहिवाशांना अप्रुप होते. कचरा निर्मूलनासाठी शहरातील सोसायट्या, चाळी, झोपडपट्टी भागात त्यांनी जनजागृतीसाठी अनेक बैठका घेतल्या. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा अधिकारी म्हणू कोकरे यांची ओळख होती. त्यामुळे शहरातील विविध संस्था, नागरिक नियमित शहरात कचरा आढळून आला तर थेट उपायुक्त कोकरे यांना संपर्क साधत होते. ती कचऱ्याची समस्या काही मिनिटात आत सोडविली जात होती. आरोग्य अधिकारी आणि कामगार यांच्यात असलेले साट्यालोट्या आणि खोटी हजेरी लावून वेतन काढण्याची पध्दती उपायुक्त कोकरे यांनी बंद केली होती.
हेही वाचा – ठाणे : ‘हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबचा मोबाईल चोरट्यांनी हातातून हिसकावून नेला
दिवसभर सफाई कामगार रस्त्यावर दिसत होते. कचरा वाहू वाहनांची शहरात सतत येजा असायची. उपायुक्त कोकरे यांची बदली झाल्या पासून अपवादात्मक परिस्थितीत सफाई कामगार शहरात दिसत आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर कचरा पडलेला असतो. स्वता आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ही परिस्थिती पाहून कल्याण मध्ये आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
चाळी, झोपड्या भाग, अनेक सोसायटयांच्या कोपऱ्यांवर उपायुक्त कोकरे यांच्या काळात रस्ते, कोपऱ्यांवर कचरा टाकणे नागरिकांनी बंद केले होते. अशा प्रकारे कचऱा फेकणाऱ्या हाॅटेल मालक, नागरिकांकडून दंड वसूल केला जात होता. ही आक्रमक कारवाई पध्दत कोकरे यांची बदली झाल्यापासून बंद झाली आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा रस्त्यावर कचरा टाकत आहेत. कचरामुक्तीमुळे अडीच वर्षापासून समाधानी असलेले नागरिक आता कचरा समस्येने पुन्हा त्रस्त झाले आहेत. ही कचरा समस्या सोडवावी म्हणून उपायुक्त कोकरे यांना संपर्क करुन लवकर बदली करुन कल्याण डोंबिवली पालिकेत या म्हणून गळ घालत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कचरा समस्ये विषयी दररोज १५ ते २० फोन नागरिकांचे येतात. त्यांना माझी बदली लातुरला झाली आहे हे माहिती नाही. तरीही मी त्यांना कोणत्या आरोग्य अधिकाऱ्याला संपर्क साधला तर ती समस्या मार्गी लागेल हे सांगतो. – डॉ. रामदास कोकरे , सह आयुक्त ,नगरपालिका प्रशासन ,लातुर