डोंबिवली :डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सम, विषम तारखेप्रमाणे वाहने उभी करण्यास सुरूवात करा. काही रस्ते एक मार्गिका करा, मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये एकही फेरीवाला दिसणार नाही याचे नियोजन करा आणि डोंबिवली शहरात येत्या आठ दिवसानंतर वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन करा, असे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवारी डोंबिवली दौऱ्यात दिले.

डोंबिवली पश्चिम भागात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसत्ताने आवाज उठविताच गुरुवारी दुपारी उपायुक्त शिरसाठ तातडीने डोंबिवलीत दाखल झाले. त्यांच्या सोबत साहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर, डोंबिवली वाहतूक विभागाचे उपनिरक्षक गोपीनाथ आढाव, साहाय्यक उपनिरीक्षक अनंत कदम, हवालदार शशिकांत गांगुर्डे, रिक्षा संघटनेचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, राजा चव्हाण, कैलास यादव, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, अधीक्षक अरूण पाटील उपस्थित होते.

हे ही वाचा…डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांविरुध्द आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू, नगरविकास विभागाचे कडोंमपाला कारवाईचे आदेश

डोंबिवली पश्चिमेतील फुले रस्त्यावरील कोल्हापुरे चौक, गोपी चौक, प्रसाद स्नॅक्स भागात दररोज संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना या कोंडीचा त्रास होतो. या चौकात वाहतूक पोलीस तैनात नसल्याने एक तास या भागातील कोंडी सुटत नाही. कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारवर्गाला या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो.या सततच्या कोंडीचे वृत्त लोकसत्तामध्ये गुरुवारी प्रसिध्द होताच, वाहतूक उपायुक्त शिरसाठ दुपारी डोंबिवलीत दाखल झाले. त्यांनी येत्या आठ दिवसात योग्य नियोजन करून शहरातील वाहन कोंडी सोडविण्याचे आदेश डोंबिवली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. वर्दळीचे रस्ते, चौक भागात एकही फेरीवाला बसणार नाही याचे नियोजन पालिकेने करावे. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये. प्रवाशांना रेल्वे स्थानक भागात उतरविणे, प्रवासी वाहनतळावर येणे यासाठी योग्य नियोजन करा. रस्त्यांवरील वाहनतळांसाठी सम, विषम तारखा निश्चित करा. अशाप्रकारचे योग्य नियोजन करून या नियोजनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश उपायुक्त शिरसाठ यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना दिले.
या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची त्रृटी राहिली तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा शिरसाठ यांनी दिला.

पालिका साहाय्यक आयुक्त सावंत, अधीक्षक पाटील यांनाही एकाही चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण करेल अशा पध्दतीने फेरीवाला बसता कामा नये, अशा सूचना केल्या. उपायु्क्तांच्या आदेशावरून डोंबिवली वाहतूक विभागाने दररोज डोंबिवली पश्चिमेतील वर्दळीचे रस्ते, चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्याचे नियोजन तातडीने केले. ही कोंडी कायम राहिली तर रिक्षा चालक मालक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हे ही वाचा…‘देवाभाऊं’च्या फलकांमुळे शहर विद्रूप, आचारसंहितेनंतरही कारवाईचा केवळ दिखावा, अनेक ठिकाणी फलक जैसे थे

प्रतिक्रिया

योग्य नियोजन करून डोंंबिवली शहरात वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन करा. पालिका आणि डोंबिवली वाहतूक विभाग यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. पंकज शिरसाठ पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग.