उल्हासनगर : उल्हासनगर शहरात भटक्या श्वानांमुळे नागरिक जीव धोक्यात घालून राहत असून दोनच दिवसांपूर्वी येथील कॅम्प एक परिसरात एकाच दिवसात सहा जणांना भटक्या श्वानाने चावा घेतल्याचे समोर आले. मात्र भटक्या श्वानांकडून झालेल्या हल्ल्यांची संख्या मोठी आहे. पालिका प्रशासन निर्बीजीकरण केल्याचा दावा करत असला तरी अजूनही शहरात चार हजार श्वान निर्बीजीकरणाविना असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. धक्कादायक म्हणजे सुमारे सव्वा कोटी रुपये या कामी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

भटक्या श्वानांचे निर्मिती करण आणि त्यांचे लसीकरण ही अत्यावश्यक बाब असली तरी याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सातत्याने दुर्लक्ष होते आहे. उल्हासनगर शहरात सोमवारी सहा जणांवर एका भटक्या श्वानाने हल्ला केल्याची घटना समोर आली. यात दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. मात्र स्थानिकांनी या एकाच श्वानाने २२ जणांना चावा घेतल्याची माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सोमवारी सुमारे १३५ जणांना रेबीज प्रतिबंधक लस टोचल्याची माहिती आहे. अनेकदा हा आकडा एका दिवसाला दीडशेहून अधिक होत असल्याची माहितीही रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्याचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात २१ हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेने वर्षभरापूर्वी पशु गणना केली होती यानुसार उल्हासनगर शहरात १६ हजार भटक्या श्वानांची नोंद करण्यात आली होती. तर वर्षभरात पालिका प्रशासनाने सुमारे १२ हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. यात एका श्वानासाठी 930 रुपयांचा खर्च पालिकेने केला. त्यानुसार सुमारे सव्वा कोटी रुपये या प्रक्रियेसाठी खर्च झाल्याची माहिती आहे. इतका खर्च होऊ नये शहरातील भटक्या श्वानांची संख्या वाढतीच असल्याने या प्रक्रियेवर संशय निर्माण होतो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करू नये शहरातील नागरिक मात्र भीतीच्या छायेतच जगत असल्याने संताप व्यक्त होतो आहे.

प्रतिक्रिया

श्वान निर्बिजीकरणाच्या निविदेला तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला होता. मात्र याला जबाबदार आरोग्य विभागाच्या संबंधित कधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. तर नवीन संस्थेला कामाचे आदेश देण्यात आले आहे. मनिषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

Story img Loader