ठाणे : जिल्ह्यात पाऊस, खड्डे आणि अवजड वाहतूक यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अवजड वाहतूकीला दिवसा बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयानंतर शहरातून दिवसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी काही भागातून आजही अवजड वाहनांची दिवसा घुसखोरी सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात, नाशिक आणि जेएनपीटी बंदरातून ठाणे आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गे ही वाहतूक सुरू असते. रात्री १० ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ यावेळेत ही वाहतूक सुरु असते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे महामार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच दुपारच्या वेळेत सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीत नागरिकांसह शाळेच्या बसगाड्या अडकून पडत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेऊन दिवसा अवजड वाहतूकीला बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई-नाशिक महामार्गाची पाहाणी करून मास्टीक पद्धतीने खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. यानंतर खड्डे भरणीच्या कामासाठी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी अवजड वाहतूकीला दिवसा बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार नवी मुंबई येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गे होणाऱ्या अवजड वाहतूकीला शिळफाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुंबई आणि नवी मुंबई मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या अवजड वाहतूकीला आनंदनगर टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिककडून येणाऱ्या अवजड वाहनांना शहापूर तर, गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांना मनोर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

अवजड वाहतूकीला ठाण्यात दिवसा म्हणजेच पहाटे ५ ते रात्री ११ यावेळेत बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत मात्र अवजड वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. ३० ऑगस्टपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे शहरातून दिवसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याने कोंडी कमी झाल्याची चित्र दिसून येत आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरून काही अवजड वाहनचालक दिवसा घुसखोरी करून शहरात वाहतूक करताना दिसत आहे. रस्ते कोंडीमुक्त असल्याने हे चालक वेगाने वाहन चालवित असून यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. घोडबंदर, ठाणे, मुंबई-नाशिक, कशेळी-काल्हेर या मार्गांवर हे चित्र दिसून येते. पालघर, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून ही वाहने रोखून धरण्याऐवजी शहरात सोडली जात आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर ही वाहने रोखून धरल्यास आणखी कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वाहनांना रोखून धरण्याऐवजी वाहतूक करून दिली जाते, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite the decision to ban heavy traffic during the day infiltration of heavy vehicles continues from some areas amy
Show comments