ठाणे : ठाणे येथील बाळकुम भागातील खाडीकिनारी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोड्याचा भराव टाकून त्या जागेवर अतिक्रमण करण्याची तयारी भुमाफियांकडून सुरु आहे. खाडीवर भराव टाकून उभारण्यात येत असलेल्या नव्या बेटामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट झाली आहे. त्याकडे ठाणे महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ठाणे शहराला ३२ कि.मीचा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी भागात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण वाढू लागले आहे. या अतिक्रमण रोखण्यासाठी पालिकेने गेल्या काही वर्षांपासून पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी योजनेतून खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. पारसिक रेतीबंदर, नागलाबंदर, वाघबीळ, कोलशेत, साकेत-बाळकुम, कळवा-शास्त्रीनगर आणि कोपरी याठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यापैकी कोपरी, साकेत या भागातील प्रकल्पांची कामे पुर्ण झाली असून काही प्रकल्पांची कामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या प्रकल्पामुळे खाडी किनारी भागाचा काही परिसराचे रुप बदलले असले तरी काही भागांंमध्ये मात्र आजही भुमाफियांकडून अतिक्रमण सुरु असल्याचे दिसून येते.
हेही वाचा >>> अंबरनाथमध्ये चार आपला दवाखाना; महाराष्ट्र दिनी होणार शुभारंभ, मिळणार मोफत उपचार
ठाणे येथील बाळकुम खाडी पुलाशेजारी मोठ्या प्रमाणात खारफुटी होती. या खारफुटीवर गेल्या काही दिवसांपासून राडारोड्याचा भराव टाकण्यात येत आहे. या भरावामुळे येथील खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. याठिकाणी आता राडारोड्याचे डोंगर दिसत आहेत. हे डोंगर सपाट करून त्यावर अतिक्रमण करण्याची तयारी भुमाफियांकडून सुरु असल्याचे दिसून येते. ठाणे-भिवंडी या मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या भागात हा भराव टाकण्यात येत आहे. हा भाग मुख्य रस्त्याशी जोडण्याचे प्रयत्न भुमाफियांकडून सुरु आहे. सद्यस्थितीत याठिकाणी जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. तरीही या खोल भागात भुमाफिया राडारोडा टाकला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याकडे ठाणे महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. बाळकुमच्या समोरील बाजुस म्हणजेच कशेळी भागातील खाडी किनारीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरु आहे. याठिकाणी तात्पुरत्या शेड उभारण्यात आल्याचे दिसून येते. या अतिक्रमणाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.