लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये म्हणून मनसेने गेल्या १५ दिवसापूर्वी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. रेल्वे स्थानक भागात दौर काढले. तेवढ्या वेळेपुरते रस्ते फेरीवाला मुक्त झाले असले तरी आता पुन्हा फ प्रभागाच्या हद्दीत नेहरु रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली परिसर पुन्हा फेरीवाल्यांनी गजबजू लागला आहे.
मागील १५ दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त झाले होते. ग प्रभागातील रस्ते, पदपथ, उर्सेकरवाडीतील फेरीवाल्यांचा बाजार ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने मोडून काढला आहे. ग प्रभागात एकही फेरीवाला बसणार नाही असे नियोजन फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी केले आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ग प्रभागाचे कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी घेतात. अशाप्रकारचे नियोजन फ प्रभागात नसल्याने आणि या प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाशी कोणताही संबंध नसताना अरुण जगताप हा कामगार फेरीवाल्यांची पाठराखण करत असल्याने त्यांच्या आशीर्वादाने फेरीवाले फ प्रभागातील नेहरु रस्ता, फडके रस्ता, नेहरु रस्ता, मानपाडा रस्त्यावरील पदपथावर बसतात, असे फेरीवालेच खासगीत सांगतात.
हेही वाचा…. वाड्याजवळ कंटेनर व बसमध्ये अपघात, २० प्रवाशांसह कंटेनर चालक जखमी
मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनी पंधरा दिवसापूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात दौरा करुन एकही फेरीवाला या भागात दिसता कामा नये. रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त पाहिजेत अन्यथा मनसे पध्दतीने फेरीवाल्यांना हटविण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता. या इशाऱ्यामुळे डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले काही दिवस गायब झाले होते. आता पुन्हा सकाळपासून फेरीवाले फ प्रभागातील कैलास लस्सी दुकानापासून ते नेहरु रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौकात रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करतात.
हेही वाचा…. श्रमिक जनता संघाचे ५७ वे राष्ट्रीय अधिवेशन ठाण्यात
डोंबिवलीत ई प्रभाग, ग प्रभाग, ह प्रभाग हद्दीतून फेरीवाले हटविण्यात फेरीवाला हटाव पथकाला यश आले आहे. परंतु, फ प्रभागातील अरुण जगताप या कामगाराची प्रशासन अन्य विभागात बदली करत नाही. त्यांना राजकीय आशीर्वाद आहे. या जगताप यांच्याच आशीर्वादाने फेरीवाले फ प्रभागातील रस्त्यावर बसतात, असे पालिका कर्मचारी सांगतात.
दोन महिन्यापूर्वी पालिकेने १५६ कामगारांच्या बदल्या केल्या. अनेक कामगारांना मूळ विभागात हजर होण्याचे आदेश आयुक्तांनी काढले तरी अनेक कामगार अद्याप आहे त्या प्रभागात कार्यरत आहेत. ह, ग, फ प्रभागात कार्यरत फेरीवाला हटाव पथकातील कामगार याच प्रभागातील हजेरी शेडवर नियुक्त केले आहेत. प्रत्यक्षात ते अद्याप फेरीवाला विभागात सक्रिय आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी या कामगारांचे ‘लाड’ करत असल्याने आणि आयुक्त या विषयात गंभीर नसल्याने डोंबिवलीतील फ प्रभागात फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर आहे आणि कामगार अधिकाऱ्यांना शांत केले की सोयीप्रमाणे बदली होते, याविषयी ठाम आहेत. त्यामुळे कामगार, फेरीवाला हे विषय पालिकेत गरमागरम आहेत, असे एका जाणकार कर्मचाऱ्याने सांगितले.