रस्ता रुंदीकरणादरम्यान वाहतूक नियमनाला फाटा दिल्याने कोंडीने चालक मेटाकुटीला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोरमधील मुख्य बाजारपेठेत रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात वाहतुकीचे नियमन होत नसल्याने मनोर-पालघर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पालघर मुख्यालयाकडे येणाऱ्या या रस्त्यावरील वाहने तासन्तास खोळंबून राहात आहेत.

मनोर पोलीस ठाणे ते मनोर स्मशानभूमी या दरम्यानचा पाऊण किलोमीटर अंतर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या रुंदीकरणात सुमारे दोन कोटी १५ लाख रुपयांचा निधी आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र सुरुवातीपासूनच रुंदीकरणाच्या कामात विघ्ने आली. सणासुदीच्या काळात रस्त्याकडील बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे कामांना उशीर झाला. रस्त्याची काही जागा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. ती न घेतल्याने वनविभागाने नोटीस पाठवून कामास हरकत घेतली.

मनोर रस्ता रुंदीकरणापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालघरचे पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मनोर पोलीस ठाण्याला या रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठीचे पत्र दिले होते. यात अवजड वाहतुकीला मज्जाव करावा, असे सूचवले होते.

रस्ता रुंदीकरणाचे काम बाजारपेठेचा मुख्य भाग वगळता एक दिशेने एकाच वेळी दोन टोकाला सुरू झाला असून वाहतूक नियमनासाठी ठेकेदाराकडील काही कामगार कार्यरत आहेत. मात्र पालघर जिल्हा मुख्यालय, पालघरमधील औद्योगिक वसाहत तसेच माहीम, सातपाटी, अल्याळी येथील वसाहतीत येणारी वाहने तसेच पालघरमधून बाहेर पडणाऱ्या  अवजड वाहनांना बोईसर-चिल्हारमार्गे वा सफाळे वरई या पर्यायी मार्गावरून मार्गस्थ न केल्याने मनोरच्या मुख्य रस्त्यावर  वाहनांच्या रांगा लागत आहेत.

मनोर मोहल्ल्यातून जाणाऱ्या एकेरी पर्यायी मार्गावरही छोटी आणि मोठी वाहने एकत्रित प्रवेश करीत असल्याने त्या मार्गावरही वाहने अनेकदा अडकून पडत आहेत. मनोरचा सव्वा ते दीड किलोमीटरचा पट्टा ओलांडण्यास वाहनांना अक्षरश: अर्धा ते पाऊण तास इतका अवधी लागत आहे. पालघर मुख्यालयाकडे जाणारा मनोर हा एकमेव आणि जवळचा मार्ग आहे. या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचे अनेक वाहनचालकांना माहीत नाही. मनोर येथे दिवसाचा काही वेळा वाहतूक नियमनासाठी पोलीस असले तरी पोलीस आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद नसल्याने वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटपर्यंत रांगा लागत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मनोर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यापूर्वी पोलीस विभागाला वाहतूक नियमनासाठी उपाययोजना करण्याचे पत्र देण्यात आले होते.

– महेंद्र किणी, अभियंता, साबांवि, पालघर

सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच वेळी दोन ठिकाणी खोदकाम सुरू केल्याने वाहतूक नियमनाचे अडचणी येत आहेत.  कामाचा व्याप पाहता मनुष्यबळ अपुरे पडत आहे.

– सिद्धवा जायभाये, साहाय्यक पोलीस निरीक्षक, मनोर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Detention in the manor market
Show comments