जिल्ह्य़ाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि शासकीय संस्थांना एकत्र आणून जिल्हा विकासाच्या कटिबद्धतेसाठी ‘समर्थ भारत व्यास प्रतिष्ठान’ची शुक्रवार ६ फेब्रुवारीला ठाण्यात निर्धार परिषद होणार आहे. निर्धार परिषदेचे हे तिसरे पर्व आहे. गावदेवी मैदान, स्टेशन रोड, नौपाडा, ठाणे येथे ६ ते ८ फेब्रुवारीला परिषद भरणार आहे. सामाजिक क्षेत्रातील मान्यवर डॉ. रवी कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, पोपटराव पवार, डॉ. प्रभाकर देवधर, डॉ. स्नेहलता देशमुख आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
परिषदेची सुरुवात शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ. विजय देवधर यांच्या हस्ते जिज्ञासा ज्ञानविज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनाने होणार आहे.
निर्धार परिषदेच्या निमित्ताने दिला जाणारा श्रीस्थानक जीवन गौरव पुरस्कार मेळघाटात काम करणाऱ्या डॉ. रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना देण्यात येणार आहे. याचबरोबर यंदापासून देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराबरोबर जिल्हा विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या व्यक्ती व संस्थेला श्रीस्थानक गौरव पुरस्कार दिला जाईल. यंदा हा पुरस्कार ऑल इंडिया ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आ. जगन्नाथ शिंदे आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला गौरवण्यात येणार आहे.
समारोपाच्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजता ‘गप्पा वैज्ञानिकांशी’ या सत्रात हेमंत मोने नागरिकांशी संवाद साधतील. परिषदेचे स्वागताध्यक्ष ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असून निमंत्रक संजय केळकर आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ‘कामगार कायद्यातील प्रस्तावित बदल आणि औद्योगिक ठाणे जिल्हा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन वागळे इस्टेट येथील टीएमए हॉलमध्ये होणार आहे. या वेळी कामगारमंत्री प्रकाश मेहता, ‘थरमॅक्स’चे शरद गांगल, ‘व्होल्टास’चे दीपक गडेकर, डी. पी. पगारे, एचडीएफसीचे अलोक शिवपुरेकर २०० हून अधिक कंपन्यांच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुखांशी संवाद साधतील. ठाणे जिल्हा शिक्षण संस्था वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने शिक्षण परिषद होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा