प्रदूषणाचं करायचं काय, या प्रश्नाने आज या जगात साऱ्यांच्या नजरा हताश आहेत; पण तो सूर्य त्या आकाशात आहे, तोवर अक्षय ऊर्जेला तोटा नाही. वसुंधरा दिनानिमित्त घरोघरी सौरऊर्जेचा प्रसार करण्याचा संकल्प पर्यावरण दक्षता मंचने सोडला आहे.
सध्या आपण सर्वजण प्रखर उन्हाने हैराण झालो आहोत. मात्र खरेतर सौर ऊर्जा ही आपल्या देशाला मिळालेले एक वरदानच आहे. पुढील काही वर्षांत कोळसा, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांसारखे ऊर्जास्रोत संपुष्टात येणार आहेत. ते तयार व्हायला शेकडो वर्षे लागत असल्याने साऱ्या जगासमोरच गंभीर समस्या उभी आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती सुखलोलुप वृत्ती यामुळे मोठय़ा प्रमाणावर ऊर्जास्रोतांचा वापर होत असल्याने आज आपण या टप्प्यावर येऊन ठेपले आहोत. त्यामुळे इंधन बचत, ऊर्जास्रोतांचा काटकसरीने व परिणामकारक वापर याबरोबरच पर्यायी ऊर्जास्रोतांचा अधिकाधिक वापर ही काळाची निकड आहे. सौरऊर्जा, वारा, पाणी आदी पर्यायी ऊर्जास्रोत आहेत.
भारताला दरवर्षी पाच हजार ट्रिलीयन केपीडब्ल्यू इतकी सौरऊर्जा प्राप्त होते. आपल्या देशातील बहुसंख्य भागात दहा महिने आपण ही ऊर्जा अतिशय परिणामकारकपणे उपयोगात आणू शकतो. भारतात ऊर्जेच्या घरगुती वापराचा विचार केला तर त्यापैकी जवळजवळ ८० ते ९० टक्के ऊर्जेचा वापर हा स्वयंपाकासाठी केला जातो. त्यामुळे इथे ऊर्जा बचत आणि सौरऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे. पर्यावरण दक्षता मंचसारख्या संस्था यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सौरऊर्जेच्या वापराविषयी जनजागृतीचे जाणीवपूर्वक कार्य करीत आहेत. वार्षिक परीक्षेनंतर आता काय करायचे या विचारात असणारे विद्यार्थी तसेच पालकांना संस्थेने थेट त्यांच्या सोसायटीत ‘सोलर कुकर’ प्रात्यक्षिक उपलब्ध करून दिले आहे.
पर्यावरण दक्षता मंच आणि केशवसृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २५ जानेवारीदरम्यान शालेय स्तरावर महासूर्यकुंभ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला, प्रयोगशीलतेला खतपाणी घालता यावे, भविष्यात सौर ऊर्जा तंत्रज्ञान अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत, अशा व्यापक उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, मामणोली येथील ४४ शाळांमधील साडेपाच हजार विद्यार्थी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. उपक्रम राबविण्यासाठी शाळांच्या भेटी घेऊन त्यांना त्याच्या उद्देशाविषयी कल्पना देण्यात आली होती. शिक्षकांना सौरकुकर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पर्यावरण दक्षता मंच या संस्थेचे मार्गदर्शक, कार्यकर्ते, ठाणे कॉलेजच्या कला/वाणिज्य कनिष्ठ विभागाचे ४० विद्यार्थी असा एक चमू तयार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना सोलर कुकरचे प्रात्यक्षिकांसहीत मार्गदर्शन केले. सौलर कुकरचे विविध भाग आणि त्यांचे कार्य याविषयीही मुलांना माहिती देण्यात आली. शिरा, पोहे, उपमा, मॅगी हे पदार्थ सौरऊर्जेच्या सहाय्याने कसे तयार होतात, हे मुलांनी प्रत्यक्ष अनुभवले. सोलर कुकरला रिफ्लेक्टर का असतो ? त्यावर अॅल्युमिनिअम फॉइल लावण्याची का आवश्यकता असते? डब्याला बाहेरून काळा रंग का दिला जातो ? इ. गोष्टीही समजावून सांगितल्या गेल्या. महासूर्यकुंभ उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांनी स्वत: सौरऊजेच्या सहाय्याने पदार्थ शिजवून पाहिले. त्यामुळे सौरऊर्जेचा वापर परिणामकारकरीत्या करता येतो, हे त्यांनी स्वत: अनुभवले.
आता अशाच प्रकारची प्रात्यक्षिके पर्यावरण दक्षता मंचच्या वतीने सोसायटय़ांमध्ये तसेच उन्हाळी शिबिरांमध्ये आयोजित केली जाणार आहेत. वार्षिक परीक्षेनंतरच्या सुट्टीत १० ते ३० एपिल या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. सुट्टीकाळात निवांत असणारी मुले आणि गृहिणी यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेत सहभागी होणाऱ्यांना संस्थेतर्फे सोलर कुकर देण्यात येणार आहेत. भविष्यातील पिढीवर पर्यायी ऊर्जास्रोतांचा अधिकाधिक वापर करण्याचे संस्कार व्हावेत म्हणून हा या मोहिमेचा उद्देश आहे. २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने संस्था घरोघरी सौर ऊर्जा प्रसार करणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ०२२-२५३८०६४८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
हेमा आघारकर
शाळेच्या बाकावरून : सुटीची ऊर्जा ‘सौर’कारणी
प्रदूषणाचं करायचं काय, या प्रश्नाने आज या जगात साऱ्यांच्या नजरा हताश आहेत; पण तो सूर्य त्या आकाशात आहे, तोवर अक्षय ऊर्जेला तोटा नाही.
First published on: 07-04-2015 at 12:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Determination of spreading use of solar energy