डोंबिवलीतील सेवाभावी संस्थेचा पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील प्लॅन्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनने येणाऱ्या २०१६ या नववर्षांत ठाणे जिल्ह्य़ातील शहरातील भटक्या कुत्र्यांना होणाऱ्या रेबीज रोगापासून कुत्र्यांची व पर्यायाने नागरिकांची सोडवणूक करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या पाच वर्षांत पाच हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांना या संस्थेने रेबीजमुक्तीची लस दिली असून २७ डिसेंबरला बदलापुरात येऊन या संस्थेने ४१ कुत्र्यांना अ‍ॅण्टी रेबीज लस दिली आहे. आगामी वर्षांत ठाणे शहरपट्टय़ातील एकाही भटक्या कुत्र्याला रेबीज होऊ न देण्याचा संस्थेचा निर्धार आहे.

ठाणे उपनगर क्षेत्रात गेल्या काही वर्षांत रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या कुत्र्यांना एकमेकांच्या संपर्कातून अनेक रोगांची लागण होत असते. त्यातील सर्वाधिक घातक रोग हा रेबीज असून त्याची लागण झालेला कुत्रा माणसाला चावल्यास मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे शहरी भागातील कुत्र्यांना अ‍ॅण्टी रेबीज लस देण्याचा निश्चय डोंबिवलीतील प्लॅन्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनने केल्याचे संस्थेच्या बदलापुरात आलेल्या संचालक व कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थापक संचालक नीलेश भणगे म्हणाले की, २००१ मध्ये ठाणे परिसरात पशू-पक्ष्यांसाठी काम करणारी संस्था नव्हती. त्यामुळे ऑगस्ट २००१ मध्ये जिल्ह्य़ातली पहिली पशू रुग्णवाहिका घेत आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात रस्त्यावरील पशू-पक्ष्यांची सेवा-सुश्रूषा करणे तसेच शाळा, शैक्षणिक संस्था, कंपन्या आदींमध्ये जाऊन दृक्श्राव्य कार्यक्रम, लघुपट दाखविणे आदी जनजागृतीची कामे आम्ही केली. संस्थेला २०१० मध्ये दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुरबाडमध्ये आम्ही सासणे गावात पशू-पक्ष्यांसाठीचे रुग्णालयही सुरू केले. सध्या ठाणे शहरपट्टय़ात आमचे २०० सेवाभावी कार्यकर्ते आहेत. आगामी नववर्ष ठाणे जिल्ह्य़ातील शहरे आम्ही रेबीजमुक्त करणार आहोत.

बदलापूरमध्ये अभियान

बदलापुरातील भटक्या कुत्र्यांना रेबीजमुक्त करण्यासाठी संस्थेतर्फे बदलापूर रेल्वे स्थानक, गांधी चौक, गोपाळ नगर आदी भागांत जाऊन ४१ भटक्या कुत्र्यांना अ‍ॅण्टी रेबीज लस दिली आहे.

आम्ही कुत्र्यांना अ‍ॅण्टी रेबीज लस देण्याचे काम ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात चालवत आहोत. कारण, शहरी भागात ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे कुत्र्यांना फुकट अन्न मिळते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते आहे व पर्यायाने त्यांच्यातील रोग वाढत आहेत. यातील रेबीज रोगावर इलाज करण्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे.

नीलेश भणगे, संस्थापक संचालक.