पालिकेच्या अट्टहासामुळे विकासकामांचे उद्घाटन रखडले; वसईकरांची नाराजी
वसई-विरारमध्ये अनेक प्रकल्पांचा श्रीगणेशा २६ नोव्हेंबर या एकाच दिवशी होणार आहे. हा दिवस काही विशेष दिवस नाही. पण या दिवशी महापौर प्रवीणा ठाकूर यांचा वाढदिवस असल्याने याच दिवशी सर्व प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा अट्टहास पालिका प्रशासनाने केला आहे. अनेक प्रकल्प तयार आहेत, पण पालिकेच्या अट्टहासापायी ती जनतेसाठी खुली करण्यात आली नाही. याबाबत वसईकरांनी नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाची खिल्ली उडवणारे संदेश व्हॉटसअॅपवरून व्हायरल झाले आहेत.
वसईच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांचा २६ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून वसईत अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यात सिग्नल यंत्रणा, ई-लायब्ररी, आरोग्य केंद्र आणि तामतलाव येथील उद्यानाचा समावेश आहे. वसईच्या तामतलाव येथील पुरातन तलावाचे सुशोभिकरण करून पालिकेने अद्ययावत उद्यान बांधले आहे. या उद्यानात तलावाभोवती जॉगिंक ट्रॅक, मुलांसाठी खेळणी, सुशोभीत झाडे लावण्यात आली होती. १ ऑक्टोबर रोजी उद्यनात आकर्षक रोषणाई असलेले कारंजेदेखील बसवण्यात आले होते. हे उद्यान सुरू करून रहिवाशांनी त्याचा वापर सुरू केला होता. मात्र अचानक या उद्यानाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे वसईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता हे उद्यान महापौरांच्या वाढदिवशी खुले केले जाणार असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. उद्यान तयार आहे मग कोणत्या नेत्याची वाट बघताय, असा सवाल स्थानिक रहिवाशी व्हेंचर मिस्किटा यांनी केला.
आम्ही या उद्यानासह इतर विकासकामांच्या उद्घाटनाची २६ नोव्हेंबर ही तारीख आधीच ठरवली आहे. मुख्यमंत्र्यांनापण या दिवशी आणायचा प्रयत्न आहे – प्रवीणा ठाकूर, महापौर
उद्यान तयार असले तरी कारंज्याचे काम बाकी आहे. त्यामुळे आम्ही ते जनतेसाठी खुले केलेले नाही – सतीश लोखंडे, आयुक्त
उद्यान तयार आहे. फक्त कारंज्याची चाचणी करायची आहे, तसेच सुरक्षेसाठी वीज केबल बदलायच्या असल्याने जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. – प्रवीण शेट्टी, सभापती, प्रभाग समिती ‘आय’