स्वामी विवेकानंद म्हणतात की, शिक्षणाने समाजातल्या तळागाळातल्याकडे बघण्याची दृष्टी निर्माण होते. समाजातील काही सजग, संवेदनशील व्यक्ती खऱ्या अर्थाने दृष्टी अवलंबतात आणि वैयक्तिक प्रगती साध्य करीत असताना कष्टकऱ्यांच्या जगण्याचा, त्यांच्या संघर्षांचा कळकळीने विचार करतात. त्यांच्या परिस्थितीमध्ये थोडाफार बदल घडवण्याच्या कामी (आणि पर्यायाने त्यांच्या प्रगतीच्या हेतूने) हातभार लावला म्हणून कृतिशील पावले उचलतात. केशव मोरेसर यांनी कष्टकरी समाजातील मुलांच्या सर्वागीण विकासासाठी शाळेचे माध्यम निवडले.
७२ साली मराठवाडय़ात भीषण दुष्काळ पडला आणि तेथील अनेक कुटुंबांनी वर्तकनगर परिसरात आपल्या कष्टप्रद जगण्यास सुरुवात केली. या लोकांचे जगणे आणि त्या जगण्याची दाहकता मोरेसर जवळून अनुभवत होते. रस्त्यावर उन्हातान्हात भटकणारी, उनाडक्या करणारी मुले पाहताना त्यांच्या भविष्याचा विचार सरांना अस्वस्थ करीत होता. या मुलांची फी भरणे शक्य नसल्याने ही मुले शाळेतच जात नव्हती. या मुलांच्या आयुष्याला एक दिशा मिळवून देण्यासाठी शाळेची निकड मोरेसरांना प्रकर्षांने जाणवत होती. त्यासाठी आर्थिक तरतूद ही मोठी समस्या त्यांच्यापुढे होती. पण ते नाउमेद झाले नाहीत. समविचारी लोकांच्या सहकार्याने त्यांनी पंचशील एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना (७२ साली) केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्याने मोरेसरांना कर्मवीरांना जवळून अनुभवता आले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरांनी कार्यास सुरुवात केली. सर आणि त्यांचे मित्र या दोघांनी पदरची शिल्लक उपयोगात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला.
महाराष्ट्र हौसिंग बोर्डाच्या भाडय़ाने मिळालेल्या एका छोटय़ा खोलीत त्यांनी वाचनालय सुरू केले. वाचनालयात प्रवेश केल्यावर कपाटात नीटनेटकेपणाने ठेवलेली विविध प्रकारची पुस्तके आपल्या दृष्टीस पडतात. एका छोटय़ाशा खोलीचा किती परिणामकारकरीत्या उपयोग करता येतो ते इथे अनुभवता येते. सकाळी योगासनाचे वर्ग, मग बालवाडी, मग शाळा, संगणक प्रशिक्षण वर्ग, संध्याकाळी वाचनालय अधिक अभ्यासिका. ज्या मुलांना काही अडचणींमुळे घरी अभ्यास करणे शक्य नसते ही मुले खोलीच्या एका कोपऱ्यात रोज अभ्यास करण्यासाठी येतात. येथील रहिवाशांची जागेची अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ही सवलत दिली जाते आणि त्यासाठी शुल्क आकारले जात नाही.
८७ साली बालविकास मंदिर शाळा सुरू झाली. या शाळेत येणारी मुलेही श्रमजीवी कुटुंबातली असल्याने घरी अभ्यासासाठी पोषक वातावरणाचा अभाव असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शाळेतर्फे सातत्याने अनेकविध उपक्रम राबवले जातात. सध्याच्या स्पर्धात्मक जगात स्वत:ला ठामपणे उभे राहता यावे यादृष्टीने मुलांना वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून घडवण्यास इथे प्राधान्य दिले जाते. हसतखेळत शिक्षण पद्धतीचे महत्त्व लक्षात घेऊन या पद्धतीनुसार शिशूवर्गामध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. लिखाणावर भर न देता गाणी/ गोष्टी/ खेळ आणि प्रोजेक्टरच्या मदतीने या मुलांना शिकवले जाते.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, जेणेकरून हळूहळू मराठी साहित्याची ओळख होईल आणि पुस्तकांमधून विविध स्वरूपाची माहिती सहज मिळू शकते याची जाणीव व्हावी म्हणून या शाळेत विशेष भर दिला जातो. या शाळेतील विद्यार्थ्यांना एका दात्याच्या सहकार्याने बाळवाङ्मयाच्या पेटीमधील (कुसुमाग्रज प्रतिष्ठान) पुस्तकांचा आनंद घेता येतो. ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सौजन्याने दर महिन्याला इ. १ली ते १०वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी ५० पुस्तके शाळेस दिली जातात. शाळेच्या वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी जवळपास तीनशे पुस्तके आहेत. इयत्तांनुसार पुस्तकांची विभागणी केली जाते. प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधीकडे पुस्तकांचा गठ्ठा दिला जातो. दर शनिवारी शाळेव्यतिरिक्त एक तासिका वाचनासाठी राखून ठेवण्यात आली आहे. वर्गप्रतिनिधी मुलांमध्ये पुस्तके वाटतो. त्यानंतर मग छोटे छोटे गट करून वाचलेल्या पुस्तकाविषयी प्रत्येक गटात चर्चा केली जाते. त्यामुळे विद्यार्थी खरेच वाचतो का नाही याचाही अंदाज घेता येतो.
विद्यार्थ्यांना अवांतर इंग्रजी वाचायची सवय व्हावी म्हणून एका दात्याने या शाळेसाठी लहान मुलांसाठी असलेले इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनावर, बोलण्यावर इथे भर दिला जातो. त्यादृष्टीने शिक्षक आपल्यापरीने प्रयत्न करतात. या मुलांना विविध प्रकारच्या सीडीज ऐकवल्या जातात, पाहायलाही दिल्या जातात. इंग्रजीप्रमाणे गणित, विज्ञान इ. विषयांची मुलांना धास्ती वाटू नये, ते कळायला सोपे जावे म्हणून सीडीज स्वरूपातील पर्यायाचा परिणामकारकरीत्या उपयोग केला जातो. प्रोजेक्टरच्या साहाय्याने इ. १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवले जाते.
मुलांना पुस्तके वाचायला देणे, त्यावर गटागटात चर्चा करून वाचनाची आवड जशी निर्माण केली जाते, त्याचप्रमाणे त्यांना चांगले लिहिण्याची सवय व्हावी या दृष्टीनेही वर्षभर प्रयत्न केले जाते. सण-उत्सव, राष्ट्रीय सण इ. निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धाच्या वक्तृत्व स्पर्धा निमित्ताने मुले पुन्हा पुस्तकांकडे वळावीत, त्यांनी पुस्तके शोधून स्वत: लिहिण्याचा प्रयत्न करावा हा हेतू यामागे असतो. निसर्गाचे निरीक्षण, आकाशदर्शन हे अनुभवही विद्यार्थ्यांना आवर्जून दिले जातात. या मुलांसाठी हे सगळे अनुभव अतिशय महत्त्वाचे असतात. वेळोवेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाते.
शालांत परीक्षेत या मुलांना उत्तम गुण मिळावेत आणि पुढे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे म्हणून एका महिलांच्या संस्थेच्या सहकार्याने विशेष मार्गदर्शन या शाळेत दिले जाते. या संस्थेतर्फे १०वीच्या विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवार दररोज खास मार्गदर्शन दिले जाते. मोरेसर जसे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत त्याचप्रमाणे परिसरातील मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत करण्यास सदैव तत्पर असतात. याच संस्थेतर्फे आर्थिकदृष्टय़ा अतिशय दुर्बल स्तरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची ओळख आणि त्यांना बऱ्यापैकी इंग्रजी बोलता-वाचता येईल यादृष्टीने शिकवायची इच्छा होती. आज मोरेसरांनी मदतीचा हात दिल्याने १० वर्षांच्या आतील १५ ते २० मुलांना इंग्रजी शिकवले जात आहे. सोम. ते शुक्र. ५.३० ते ७.३० या वेळेत हा उपक्रम शाळेच्या एका वर्गात राबवला जात आहे. ही मुले आजूबाजूच्या वस्त्यांमधून शोधून आणण्यात आणि शाळेचा वर्ग देण्याचे सहकार्य सरांनी देऊ केल्याने या मुलांना ही संधी प्राप्त झाली.
सरांच्या शाळेतील १९ विद्यार्थी असे आहेत ज्यांना आई-वडील नाहीत. या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांना त्यात यश आले. ठाण्यातील १९ दात्यांनी या मुलांना दत्तक घेतले आहे. म्हणजेच शिक्षणाचा आर्थिक भार या लोकांनी उचलला आहे. मोरेसरांचे कार्य आणि त्या कार्यावरील विश्वास त्याच्या बळावरच हे साध्य झाले आहे हेच खरे! ध्येयासक्तवृत्ती आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढीत ध्येय प्राप्त करता येते हे मोरेसरांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच कष्टकरीवर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या मोरेसरांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरते.