मीरा रोड
ऐंशीच्या दशकात मिठागरांच्या जमिनीवर शांतीनगर ही वसाहत उभी राहिली. अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी खास ही वसाहत बांधण्यात आली. त्यानंतर शीतलनगर, नयानगर, शांती पार्क या वसाहतीदेखील उभ्या राहिल्या. हा सर्व भाग मीरा रोड या परिसरात मोडतो. मध्यम वर्गीय, उच्च मध्यम वर्गीय, नोकरदार आणि व्यावसायिक अशा सर्व स्तरांतील लोक मीरा रोडमध्ये राहतात.
१९८० च्याआधी मीरा रोडला चार-पाच घरांचा अपवाद वगळता वस्तीच नव्हती त्यामुळे रेल्वेनेदेखील याठिकाणी स्थानक का बांधले असा प्रश्न त्या काळी पडायचा. परंतु पुढे हळूहळू शांतीनगर वसाहतीच्या इमारती या ठिकाणी उभ्या राहू लागल्या आणि मुंबईतला अल्प उत्पन्न गटातील लोक या ठिकाणी राहायला येऊ लागले. शांतीनगरमध्ये सर्वधर्मीय लोक राहात असले तरी काही सेक्टरमध्ये जैन, गुजराती समाजाची लोकसंख्या अधिक आहे. शांतीनगर पाठोपाठ, नयानगर आणि शीतलनगर हा भागही विकसित झाला. नयानगर भागात मुस्लीमधर्मीय मोठय़ा संख्येने राहतात. शांतीनगरसाठी सुरुवातीला विकासकाने स्वत:ची पाणीपुरवठा योजना राबवली होती. शिवाय विकासक रहिवाशांकडून करही गोळा करत असे. दुहेरी कर ही समस्या अनेक वर्षे रहिवाशांना भेडसावत होती. मात्र या नगरीतील अंतर्गत रस्त्यांसह पाणीपुरवठा योजना महानगरपालिकेने आपल्याकडे वर्ग करून घेतल्यानंतर हा त्रास कमी झाला.
मीरा रोडच्या या भागात सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व होते. माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी परिसरावर चांगली पकड निर्माण केली होती. ही पकड २०१२ च्या निवडणुकीत सैल झाली. शांतीनगरच्या काही सेक्टरमध्ये भाजपने आपले बस्तान चांगलेच बसवले. परंतु शांतीनगरचा काही भाग, नयानगर, शीतलनगर भागात काँग्रेसने आपली ताकद कायम ठेवली. नयानगरमध्ये गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही चंचुप्रवेश केला. शिवाय मध्यंतरीच्या काळात एमआयएमदेखील कार्यरत झाली होती. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाहीत, स्थानिक कणखर नेतृत्व नाही. एमआयएमचीदेखील हीच अवस्था आहे. भाजप आणि शिवसेना यांची युती नसल्याने एकमेकांचे नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण दोन्ही पक्षांत चांगलेच रंगले. शिवसेना या ठिकाणी आता स्वत:चे अस्तित्व निर्माण करू इच्छित आहे आणि काँग्रेस कमी झालेली ताकद पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि शिवसेना अशी तिहेरी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी आपले उमेदवार उतरवेल परंतु त्यांची ताकद फारच मर्यादित असल्याने त्यांचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
या नगरीत नियोजनबद्ध इमारती उभ्या करण्यात आल्या असल्या तरी बगीचे, बाजार यासाठी कोणतीही आरक्षणे या ठिकाणी नव्हती. महानगरपालिकेने विकासकाच्या ताब्यातील मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आता बगीचे आणि खेळाची मैदाने विकसित केली आहेत; परंतु फेरीवाल्यांची समस्या मात्र उग्र आहे. रेल्वे स्थानक परिसर, सेक्टर दोनमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते अडवले असल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. रस्त्यावर अनधिकृतरीत्या उभी रहाणारी वाहने, पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात तुंबणारे पाणी, धोकादायक बनत चाललेल्या इमारतींचा पुनर्विकास अशा काही समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत.
- मीरा रोड परिसरात प्रभाग ९, १७, १९, २०, २१, २२
- मतदारांची संख्या – १५२७५९
- पुरुष मतदार – ७८६३६
- स्त्री मतदार – ७४११६
जिंकून येणारा नगरसेवक स्वच्छ चारित्र्याचा असावा, नागरिकांना तो आपलासा वाटणारा हवा. एकदा निवडून आल्यानंतर नगरसेवक पाच वर्षे पुन्हा प्रभागात फिरकत नाहीत. त्यामुळे लोकांशी सातत्याने संपर्क करणारा अभ्यासू नगरसेवक महानगरपालिकेत निवडून यायला हवा,
– अर्पिता शेडगे
निवडणुकीवर अमाप पैसे खर्च करून निवडून येणारे लोकप्रतिनिधीदेखील असतात. हेच प्रतिनिधी मग खर्च झालेला पैसा वसूल करण्यासाठी भ्रष्टाचार करत असतात. त्यामुळे मतदारांनी उमेदवाराची चांगली पारख करून त्यालाच निवडून द्यावे.
– महेश चव्हाण