शहापूर येथील दापूरमाळ गावात समाजोपयोगी प्रकल्पांना चालना
समाजमाध्यमांमार्फत आवाहन केल्यानंतर मिळालेल्या आर्थिक मदतीतून शहापूर येथे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणांनी दापूरमाळ गावचा विकास केला आहे. डिजिटल शाळा, सौरदिवे व लोकसहभागातून बांधलेले पाण्याचे कुंड आदी सर्व सुविधांचा लाभ येथील लहान मुले तसेच मोठी माणसेही घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहापूर तालुक्यातील दापूरमाळ हे एक मूलभूत गरजांपासून वंचित असलेले गाव असून तेथे पोहोचण्यासाठी मूळ शहरापासून ४ ते ५ किलोमीटर जंगलातून व कडेकपाऱ्यातून पायी जाणे हाच एकमेव मार्ग आहे. या गावात वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शिक्षण सेवा तर या गावात दुर्लक्षित बाब बनली आहे. येथील खडतर मार्ग स्वीकारून शिक्षणदानाची वाट धरण्यास शिक्षक उत्सुक नसल्याने मंजूर शाळेचा प्रकल्पही कागदावरच राहिला आहे. येथील पायाभूत सुविधांचे हे दुर्भिक्ष लक्षात घेऊन कर्वे समाजसंस्थेच्या स्नेहल नाईक आणि वात्सल्य फाऊंडेशनमध्ये कार्यरत असणारे महेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला.
त्यानंतर गावाची नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती बघून ई-लर्निगच्या माध्यमातून शाळा मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या शाळेत एक एलईडी टीव्ही, एअर माऊस, एअर कीबोर्ड आणि सौरऊर्जा संच संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही मदत त्यांनी व्हॉट्सअप, फेसबुक व ऑनलाइन वेबसाइटद्वारे फक्त सात दिवसांत उभारल्याचे स्नेहल याने सांगितले. या वेळी कर्वे समाजसेवा संस्था आणि वात्सल्य फाऊंडेशनचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. येथे उभारण्यात आलेल्या पाण्याच्या कुंडामध्ये ५ ते ७ हजार लिटर पाण्याची साठवणूक केली जात आहे. या कुंडामुळे गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी पिता येत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. दापूरमाळमधील रोजगाराचा आणि इतर मूलभूत प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष या गावाकडे केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले. वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गावात अंगणवाडीचा उपक्रम सुरू असून अंगणवाडी शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे ई-लर्निगद्वारे मुलांचे अभ्यासवर्ग राबविण्यात येतील.
सामाजिक माध्यमांचा वापर चॅटिंग आणि सेल्फीपुरता मर्यादित न ठेवता या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न या तरुणांचा आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी हे समाजमाध्यम कमालीचे उपयोगी ठरू शकते याची जाणीव होताच या तरुणांनी आखलेला प्रकल्प सध्या या परिसरात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एका लहानग्या गावात पाण्याचे कुंड उभारून घेताना समाजमाध्यमांच्या माध्यमातून या तरुणांनी देशविदेशातील तरुणांना जोडले असून दिल्लीतील काही तरुणांतर्फे या ठिकाणी २४ सौरदिवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा