प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही कलागुण असतात, काही कौशल्ये असतात. विद्यार्थ्यांमधील या सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव मिळावा, त्यांच्या क्षमता विकसित व्हाव्यात म्हणून काही उपक्रम जाणीवपूर्वक राबवले जायचे किंवा सर्व शाळांमधून अशा तऱ्हेचे उपक्रम राबवण्याची परंपरा होती. शाळेचे मासिक हा अशा प्रकारचाच एक उपक्रम. काळानुरूप बदल होत असताना हस्तलिखित आणि भित्तिपत्रिका तयार करण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे असे दिसून येते. त्या तुलनेत शाळेचा वार्षिक अंक मात्र काही शाळांमधून अजूनही काढला जातो.
शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक सर हस्तलिखित/ मासिक या उपक्रमाचे महत्त्व सांगतात, ‘‘पूर्वी निबंधलेखनाला पूरक म्हणून भित्तिपत्रिका/ हस्तलिखित किंवा मासिक अशा स्वरूपाचे उपक्रम शाळाशाळांमधून जाणीवपूर्वक राबवला जात असे. शाळेच्या एका अंकात सर्व विद्यार्थ्यांना पुरेशी संधी देता येत नाही म्हणून मग वर्गावर्गातून हस्तलिखित किंवा भित्तिपत्रिका तयार केल्या जायच्या. बहुवाचिक शिक्षणाकडे याची जबाबदारी सुपूर्द केली जायची आणि खरोखरच दर्जेदार अंक तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जायचा. या उपक्रमांमुळे मुलेदेखील विविध साहित्य प्रकार लिहिण्याचा प्रयत्न करू लागली. लेख कसे लिहायचे ते कॉलममध्ये कसे बसवायचे, मासिकाचा आराखडा, लेखांची मांडणी, त्यांचे मुखपृष्ठ, हस्तलिखिताची सजावट आणि बांधणी या सर्व दृष्टीने मुले अनुभव घ्यायची आणि ही संपूर्ण प्रक्रिया अनुभवताना त्यांचे अनुभवविश्वही समृद्ध व्हायचे.’’
ठाण्यातील वसंत विहार परिसरातील अनमोल विद्यालय शाळेमध्ये समाजातील कष्टकरी वर्गातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर येतात. या मुलांना वैविध्यपूर्ण अनुभव देताना त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे आणि त्यांना घडवायचे असा जाणीवपूर्वक प्रयत्न इथे सातत्याने केला जातो. या मुलांना वाचनाची, माहिती गोळा करण्याची आणि स्वत:ला व्यक्त करण्याची सवय लागावी या दृष्टीने ‘अनमोल भरारी’ मासिक (वार्षिक) काढले जाते. शाळेतील तीन शिक्षकांची समिती नेमली जाते. सर्व विद्यार्थ्यांकडून लेख मागवले जातात आणि मग त्यातून लेखांची निवड केली जाते. दर वर्षी विषय दिला जातो, जेणेकरून मुलांना वाचनाची, माहिती गोळा करायची, लिहिण्याचा प्रयत्न करण्याची सवय लागते आणि ही मुले खरोखरच धडपड करतात, असे अनमोल विद्यालयाचे शिक्षक सांगतात. एक वर्ष ‘माझी मायबोली’, नंतर ‘माझा गाव’, ‘माझी शाळा’ असे विषय हाताळण्यात आले आहेत. गेल्या वर्षीचा अंक पाहिला तर विद्यार्थ्यांनी अनेकविध विषय हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. स्त्री-भ्रूणहत्या, अंधश्रद्धा मिटेल का? इंटरनेट शाप की वरदान इ. गंभीर विषयांवरील लेख आहेत. माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण, जीवन आनंदाचा झरा, माझे आवडते पुस्तक, आवडता लेखक असे छान लेख आहेत. त्याचबरोबर छोटय़ा कविता, गोष्टी, विनोद, विज्ञान जगतातील घटना, माहिती असेही विविध लेख आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शाळेचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे सर्वागीण प्रगती करीत आयुष्यात भरारी घ्यावी म्हणून ही शाळा खरोखरच प्रयत्नशील असते आणि म्हणून ‘अनमोल भरारी’ हे मासिकाचे नावही साजेसेच आहे.
डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेतर्फेदेखील ‘पारिजातक’ नावाचा अंक दर वर्षी काढला जातो. विद्यार्थ्यांच्या अनुभवातून तयार झालेल्या लिखाणावर या अंकात भर दिलेला दिसून येतो. शाळेच्या आवारातील तिन्ही दलांच्या प्रगतीचा आढावा या अंकात आहे. त्याचबरोबर अभ्यास, कला, क्रीडा, विविध स्पर्धा अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी जे यश प्राप्त केले आहे त्याचा आढावाही अंकात आहे.
‘पारिजातक’ अंकामध्ये विविध विषयांवरील लेख, कविता, कोडी, विनोद आणि शिक्षकांचे लेखदेखील आहेत. ‘शिक्षणाचा समभुज त्रिकोण’, ‘संगीत एक जादू’ असे शिक्षकांनी लिहिलेले लेख आहेत. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिकप्राप्त विद्यार्थिनींची भाषणे, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या निमित्ताने आलेला एका विद्यार्थिनीचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे ‘आजची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी’, ‘आजची शिक्षण पद्धती नोकरी मिळवून देणारी आहे का’ असे वेगळ्या विषयांवरील लेख आहेत. मुलांना कोकणविषयी आपुलकी असते ते अंकावरूनही जाणवतं. ‘माझं कोकण’, ‘कोकणातली आजी’, ‘शेतकरी’ इ. कविता याच विषयांवर केल्या आहेत. आईबद्दल बहुधा सर्वच अंकांमधून मुले लिहू पाहतात असे दिसते. या अंकातही कविता आणि लेख आहेत.
‘ग्रेट भेट’अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांची विद्यार्थ्यांनी घेतलेली मुलाखत आहे.
सरस्वती मंदिर ट्रस्ट संस्थेच्या प्राथमिक विभागातर्फे ‘सरस्वती पुष्प’ नावाचे हस्तलिखित दर वर्षी तयार केले जाते. यंदा ४२वे हस्तलिखित तयार करण्यात आले ही गोष्ट विशेषत्वाने नमूद करण्याजोगी आहे. साडेतीन तपे प्रयत्नपूर्वक एखादा उपक्रम सातत्याने चालवणाऱ्या या प्राथमिक विभागाचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते. अंकाचे मुखपृष्ठच आकर्षक आणि देखणे नसून संपूर्ण अंक अतिशय देखणा, आकर्षक आणि प्रत्येक पानासाठी घेतलेली मेहनत प्रकर्षांने जाणवते. या रंगीबेरंगी अंकात भरपूर चित्रे, छोटय़ा कविता, पशू-पक्ष्यांची माहिती, सामान्य ज्ञान, संग्रहित माहिती असा विपुल साठा आहे. दिवाळीच्या सुट्टीत लिहायला दिले जाते आणि अंकाची पूर्वतयारीही होते. विद्यार्थ्यांकडून आलेल्या लेखांपैकी निवडक लेख शिक्षकांची समिती निवडते आणि अंक दर्जेदार होईल याची खबरदारी घेतली जाते. मुलांनी काढलेले गणपतीचे चित्र आणि त्यावरील गाणे किंवा मुलांना आवडणारी मनीमाऊ, खारुताई, अगदी उंदरावरील कविता वाचताना मजा वाटते. मुलांनी काढलेली प्राण्यांची/ फुलांची/ पक्ष्यांची/ घर/ देखावा/ बाग अशी त्यांना भावणाऱ्या विविध विषयांवरील भरपूर चित्रे या अंकात आहेत.
चिमण्या उडय़ा मारीत का चालतात, मधमाशी मध कसा तयार करते, झऱ्यापासून काय मिळते. शिक्षकांनी घेतलेली मेहनतही प्रकर्षांने दिसून येते. मुख्याध्यापक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून एखादी चांगली कल्पना प्रत्यक्षात किती चांगल्या प्रकारे साकार होते हे ‘सरस्वती पुष्प’ हस्तलिखित वाचताना अनुभवता येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा