कल्याण- कल्याण-डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या, नागरीकरण याचा विचार करुन पालिकेने १० वर्षापूर्वी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर या वाढत्या वस्तीचा येणारा भार विचारात घेऊन रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्याचे काही प्रकल्प प्रस्तावित केले होते. या प्रकल्पांचे आराखडे तयार केले होते. हे प्रकल्प अस्तित्वात आले असते तर आता पुणे, मुंबई, ठाणे रेल्वे स्थानक परिसरांसारखा कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांचा परिसर सुटसुटीत दिसला असता, अशी माहिती या प्रकल्पावर काम करणारे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (निवृत्त) संजय घरत यांनी दिली.
इतर शहरांमध्ये नागरी सुविधा देताना पक्षीय पातळीवर कितीही मतभेद असले तरी विकासाच्या मुद्द्यावर ही मंडळी नेहमीच एक झाली. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, पुणेसह इतर शहरांचा झपाट्याने विकास झाला. अशाच पध्दतीने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्याचे नियोजन प्रस्तावित होते. येथली राजकीय इच्छाशक्ती फक्त गटार, पायवाटा, पदपथे, नाले-गटार सफाईमध्ये अडकुन पडली. महत्वाचे विकास प्रकल्प या शहरात आकाराला आले नाहीत, असे निवृत्त अतिरिक्त आयुक्त घरत यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मीरा रोडमध्ये पोलिसावर हल्ला करून आरोपी फरार, पोलिसाची प्रकृती गंभीर
कल्याण स्थानक विकास
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तहसीलदार कार्यालय, रेल्वे पोलीस ठाणे, दिलीप कपोते वाहनतळ, बोरगावकरवाडी, एस. टी. आगार हा परिसर समुह विकासातून विकसित करावा, असे नियोजन होते. तीन ते चार एकर या परिसराच्या विकासाने रेल्वे स्थानकाच्या बाजुला तळ मजल्याला ८०० हून अधिक रिक्षा, दोन हजार दुचाकी उभ्या राहतील असे वाहनतळ, ५० हून अधिक बस एकावेळी आगारात उभ्या राहतील, असे नियोजन होते. रेल्वे स्थानकात येजा करणारा प्रवासी वाहनतळावरील जिन्यामधून थेट स्कायवाॅकवरुन रेल्वे स्थानकात जाईल, असे नियोजन होते. वाहनतळ इमारतीच्या वरील मजल्यांवर तहसीलदार कार्यालय, रेल्वे पोलीस, महात्मा फुले पोलीस ठाणे, पालिकेचे साहाय्यक आयुक्त कार्यालय, अग्निशमन कार्यालयांचे नियोजन होते. या प्रकल्पांमुळे आता कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात जे बकालपण, सततची कोंडी दिसते तो प्रकार दिसला नसता, असे घरत यांनी सांगितले. पश्चिमेतील प्रकल्प यशस्वीतेनंतर हाच प्रयोग कल्याण पूर्वेत राबविण्याचे नियोजन होते, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> ठाण्यात धावत्या कारनं अचानक पेट घेतला, ७ जण थोडक्यात बचावले!
डोंबिवली परिसर विकास
डोंबिवली पूर्व भागात पालिकेची विभागीय इमारत, पालिकेसमोरील इमारत, विरा शाळेजवळील पालिकेची हिंदी शाळा, बाजीप्रभू चौक ते चिमणी गल्ली हा परिसर विकसित करण्याचे नियोजन होते. पीपी चेम्बर्स ते फडके रस्ता ही १५ मीटर रुंदीचा रस्ता, बाजीप्रभू चौक ते मानपाडा रस्ता २१ मीटर रुंदीचा रस्ता, इंदिरा चौक ते पीपी चेम्बर्स १८ मीटर रुंदीचा रस्ता. हे रस्ते विकसित झाले असते. पालिकेसमोरील इमारत मालकाला टीडीआर देऊन रस्त्यावरील इमारतीचे नियोजन केले असते तर आता पीपी चेम्बर्ससमोर वळणावर होणारी कोंडी टळली असती. या विकसित भागात बस, केडीएमटी बस, दुचाकी, रिक्षा वाहनतळ असे नियोजन होते, असे घरत यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य मिळावे म्हणुन कल्याण, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात केडीएमटीच्या दोन मोफत प्रवास बस सेवेचे नियोजन होते. यामुळे रिक्षा चालकांच्या मनमानीला आळा बसला असता. डोंबिवली पश्चिमेत मासळीबाजार, ग्रंथसंग्राहलय इमारत एकत्रित विकसित करुन येथे दुचाकी वाहनतळ, मासळी बाजाराचे नियोजन होते. पालिका पदाधिकारी, राजकीय मंडळींनी या प्रकल्पांमध्ये नेहमीच हेव्यादाव्यांचे, स्वताच्या हिताचे राजकारण केले. त्यामुळे हे प्रकल्प आकाराला आले नाहीत. भविष्यवेधी शहर विकास हे चित्र समोर ठेऊन कोणत्याही लोकप्रतिनिधीने कामे न केल्याने त्याचे चटके आता डोंबिवली, कल्याण शहरांना बसत आहेत, अशी खंत घरत यांनी व्यक्त केली.