ठाणे : प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ठाण्यात केली. हे राजकीय हिंदू आहेत पण, आमच्या नसानसात हिंदुत्व आहे. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व सांगायची गरज नाही, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील घोडबंदर भागातील आंनदनगर भागात रामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली. माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री असा माझा परिचय असला तरी माझा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे रामसेवक आणि कारसेवक. अयोध्येला कारसेवक म्हणून गेलो तेव्हा माझे वय किती होते, असा प्रश्न उद्धव ठाकरे विचारतात. पण मला त्यांना सांगायचे आहे की, मला वयाच्या २० व्या वर्षी रामाची सेवा करण्याची संधी मिळाली. मी कार सेवेला गेलो होतो, तेव्हा तुम्ही निर्सगाची फोटोग्राफी करत होता. तुमची फोटोग्राफी जेव्हा सुरू होती, तेव्हा कारसेवक छातीवर गोळ्या झेलून मंदिर इथेच बनविणार असे ठणकावून सांगत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा – दिवा पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या शिंदे गटाला पाण्यात बुडवा – उद्धव ठाकरे

अयोध्या कारसेवेत आमचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर कारसेवक होते. तुमच्याबरोबर असलेला एकजण तरी कारसेवेत होता, हे दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. त्याची लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. राज्यात काही लोक म्हणत होते. मंदिर कधी होणार पण, आम्ही मंदिरही बनवले आणि उद्घाटन तारीखही सांगितली. आता तुमच्यात हिम्मत असेल तर २२ तारखेला मंदिर उद्घाटन सोहळ्याला या. पण, ते येणार नाहीत. नाकारलेल्या रामाला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या वजनाने बाबरीचा ढाचा पडला असेल, पण त्यांना सांगू इच्छितो की, बाबरीचा ढाचा ही छोटी गोष्ट आहे. आम्ही रामसेवक असल्यामुळे आम्ही हिमालय पर्वत हलविण्याची ताकद ठेवतो, असेही ते म्हणाले.

ठाण्यातील काही महाभाग म्हणतात, राम काय खात होते. आता राम काय खात होते हे सर्व बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खाता, हे आता आमच्या लक्षात आले आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. रामायणमध्ये मंथरा होती, तसे उद्धव ठाकरे यांच्याकडेही मंथरा आहे. रामयनमध्ये पुण्यवान दशरथ राजा होते. पण तुमच्याकडे तसे काहीच नाही. त्यामुळे मंथरामुळे तुमचे काय होईल माहीत नाही, असा टोला लगावत त्यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

हेही वाचा – कल्याण लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

ठाण्यातील कारसेवकांचा सत्कार

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी कारसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये मारुती शेळके, अंजली शेळके, प्रमोद घोलप, मोहन नाणे, अनिरुद्ध साठ्ये, सुजित साठ्ये, डॉ. अंजली गांगल यांचा समावेश होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticizes uddhav thackeray in thane balasaheb was a real tiger but uddhav thackeray is not a real tiger says devendra fadnavis ssb