Devendra Fadnavis on Akshay Shinde Encounter: बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. पण आता हे एन्काऊंटर ठरवून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अक्षय शिंदेच्या पालकांनीही तसाच दावा केला आहे. त्यासंदर्भात चर्चांना उधाण आलेलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत पोलिसांच्या कृतीला पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे. तसेच, तपासातून यातलं सत्य लोकांसमोर येईल, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर भाष्य केलं. त्याचवेळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणीही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी पोलिसांवर बंदूक रोखली तर पोलीस टाळ्या वाजवणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आमचा एन्काऊंटर पद्धतीवर विश्वास नाही”

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी त्यांचा एन्काऊंटर पद्धतीवर विश्वास नसल्याचं स्पष्ट केलं. “पहिली गोष्ट म्हणजे आमचा एन्काऊंटर पद्धतीवर विश्वास नाही. माझं म्हणणं आहे की कोणत्याही न्यायप्रक्रियेत कायदा पाळला गेला पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी”, असं ते म्हणाले.

“या प्रकरणात तपासात समोर येईल की बंदूक कशी काढली गेली? ती आरोपीच्या हातात कशी गेली? वगैरे. पण जर कुठला गु्न्हेगार बंदूक हिसकावून आपल्या पोलिसांवर बंदूक रोखत असेल, तर पोलीस टाळ्या वाजवू शकत नाहीत. ते गोळी झाडतील आणि त्यांनी गोळी झाडली. त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी बंदूक चालवली. यातलं सत्य तपासातून सविस्तरपणे समोर येईलच”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“अशा वेळी जिथे गोळी लागते, तिथे मारावी लागते”

“काही लोक म्हणतात इथेच गोळी का मारली, तिथेच का मारली? अरे तुमच्यासमोर जर बंदूक घेऊन कुणी उभा राहिला आणि तुमच्यावर गोळी झाडत असेल, तर तुम्ही काय हे बघत राहणार का की इथे गोळी मारायची की तिथे? असं होत नाही. जिथे गोळी लागते तिथे मारावी लागते”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांच्या कृतीचं समर्थन केलं.

“या प्रकरणाची १०० टक्के न्याय्य चौकशी होईल. हा गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत होता. फक्त माझी अपेक्षा ही आहे की काल घटना घडली, आज त्याची चौकशी सुरू झाली आहे. आजच इतक्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार? म्हणे डोक्यालाच गोळी कशी लागली, पायालाच कशी लागली नाही? पुढे का लागली? मागे का लागली? वगैरे बोललं जातंय. असं नाही होत. अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही खूप स्पष्ट टिप्पणी केली आहे. मला वाटतं आपण पोलिसांना काम करू दिलं पाहिजे. सीआयडी आपला तपास करेल. तपासातून सर्व गोष्टी बाहेर येतील”, अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? आता सीआयडी करणार तपास!

“बदलापूरमध्ये घटना घडल्यानंतर पूर्ण तपास करून आम्ही न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानंतर ही दुसरी केस आली. या व्यक्तीने तीन लग्नं केली. त्याच्या एका पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्यासंदर्भात ही नवीन चौकशी चालू होती. मला वाटतं जर कुणाला नियोजन करूनच एन्काऊंटर करायचं असेल तर तो लगेच करेल. लोकांचा राग आहे तेव्हा करेल. एवढा वेळ गेल्यानंतर कुणी नियोजन करून या गोष्टी कशाला करेल?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.

“पोलिसांवर त्यानं गोळी झाडली. तो गुन्हेगारी वृत्तीचा माणूस होता. तीन लग्न, आपल्या पत्नींना त्रास देतो, छोट्या मुलींसोबत असलं कृत्य करतो. तो काही साधूसंत तर नव्हता. त्यानं जर पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर माझे पोलीस शांत बसणार नाही. ते उत्तर देतील. त्यांनी उत्तर दिलं”, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी घेतली.