देशभरात सध्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे विधी पार पडले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “आता राम आले, आता राम झोपडीत राहणार नाहीत तर भव्य मंदिरात राहतील”, असं म्हणत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मुंबईनजीक मीरारोड परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे या भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय घडलं मीरारोड भागात?
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मीरारोड परिसरात एक मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी काही समाजकंटकांनी या मिरवणुकीव दगडफेक केल्याचा प्रकार घडला. तसेच, काही लोकांना मारहाणही झाल्याचं सांगितलं जात आहे. यात चार तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य तणाव टाळला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दंगल करणे, सामाजिक तेढ निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, याचे पडसाद काही प्रमाणात सोशल मीडियावर दिसल्यानंतर पोलिसांनी लोकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं.
वाचा नेमकं काय घडलं – मीरा रोडमध्ये मिरवणूकीवर दगडफेक, वाहनांची तोडफोड
देवेंद्र फडणवीसांची सोशल पोस्ट
या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये फडणवीसांनी सीसीटीव्ही फूटेजचा पोलीस आधार घेत असल्याची माहिती दिली. “मीरा-भाईंदरच्या नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची पूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे ३.३० पर्यंत मी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत”, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
“या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही”, असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.