कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील सत्यवान चौक ते स्मशानभूमीपर्यंतच्या विकास आराखड्यातील १८ मीटरच्या रस्त्याला बाधा येईल अशा पद्धतीने दोन भूमाफियांनी बालाजी इमारतीच्या मागे एक बेकायदा इमारत अलीकडेच बांधून पूर्ण केली आहे. या इमारतीमुळे विकास आराखड्यातील रस्ता बाधित होत असल्याने परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बेकायदा इमारतीपासून १५० फूट अंतरावर पालिकेचा बाह्य वळण रस्ता आहे. वळण रस्त्याचे येत्या काळातील महत्त्व आणि या भागातील सदनिकांना येणारा भाव पाहून भूमाफियांनी बालाजी इमारतीच्या मागे कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता एक बेकायदा इमारत बांधून पूर्ण केली आहे. या इमारतीला दोन पाखे माफियांनी बांधले आहेत. या इमारतीचा एक पाखा (विंग) बांधून पूर्ण झाल्यानंतर तात्काळ तेथील सदनिका माफियांनी २८ लाखांपासून ते ३५ लाख किमतीला गरजू घर खरेदीदारांना विकले आहेत. या इमारतीची यासाठी बनावट कागदपत्रे माफियांनी तयार केली आहेत, अशा तक्रारी पालिकेत प्राप्त झाल्या आहेत. या इमारतीची रस्त्या लगतची एक पाखे रिकामी आहे. विकास आराखड्यातील रस्त्याला बाधित ही इमारत असल्याने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना देण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत शालेय पुस्तकांच्या हमालीचे काम शिक्षकांना

देवीचापाडा १८ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करताना येत्या काळात पालिकेला या बेकायदा इमारतीचा अडथळा येणार आहे. सत्यवान चौक ते पोलीस पाटील घरापर्यंत १५० मीटर रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण गेल्या दीड वर्षांपासून पालिकेकडून प्रस्तावित आहे. या टप्प्याचा पुढील भाग करताना बालाजी गार्डनमागील बेकायदा इमारतीचा अडथळा रस्ता रुंदीकरणाला येणार आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. या इमारतीला पालिकेची परवानगी नसल्याची माहिती नगररचना विभागातील अधिकाऱ्याने दिली. या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून नगररचना सर्व्हेअरकडून रस्तारेषा निश्चित करून बालाजी गार्डन मागील बेकायदा इमारत भुईसपाट केली जाईल, असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

ही इमारत उभारणाऱ्या भूमाफियांनी तीन वर्षांपूर्वी गरीबाचापाडा अनमोलनगरी येथील प्राथमिक शाळेच्या आरक्षणावर ८५ सदनिकांची एक बेकायदा इमारत उभारली आहे. ही इमारत वाचविण्याचे काम कोकणातील एका लोकप्रतिनिधीने केले होते. या लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद घेऊन भूमाफियांनी देवीचापाडा स्मशानभूमी रस्त्यावर बेकायदा इमारत उभारली आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये दुचाकीस्वारांना लुटणाऱ्यांना आंबिवलीमधून अटक

या बेकायदा इमारतीवर पालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता नसल्याने एका जागरुक नागरिकाने या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डाॅ. के. एच. गोविंद राज यांच्याकडे तक्रार केली आहे. याच रस्त्यावर मुकेश म्हात्रे आणि जितू म्हात्रे यांनी काळुबाई मंदिराजवळ १८ मीटर रस्त्याला बाधित सात माळ्यांची बेकायदा इमारत बांधली आहे. या इमारतीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devichapada crematorium road obstructed by illegal construction in dombivli ssb
Show comments