इतिहासप्रेमींकडून किल्ल्यावर साफसफाई
वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडातून मोकळा करण्यासाठी चिमाजी अप्पांनी बांधलेला उत्तनजवळील धारावीचा किल्ला आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. इतस्तत: पडलेला कचरा, वाढलेले रान, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, अतिक्रमणे यात हा किल्ला गुदमरून गेला होता. गड-किल्ले अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासप्रेमी मंडळींनी नुकतीच या किल्ल्यात साफसफाई मोहीम राबवली.
चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयात धारावी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसई किल्ल्याच्या अगदी समोर उत्तन येथील चौक परिसरात जंजिरे धारावी किल्ला आहे. चौक जेटीकडून वर गावाकडे जाताना हा किल्ला लागतो. सध्या झुडपांच्या गर्द रानात तो सहजासहजी नजरेत येत नाही. पोर्तुगीजांची समुद्रमार्गाने होणारी रसद तोडण्यासाठी चिमाजी अप्पांनी या किल्ल्याची बांधणी केली. हा टापू जिंकण्यासाठी चिमाजी अप्पांनी आठ वेळा प्रयत्न केला, नवव्या वेळी मात्र त्यांना यश मिळाले. ‘‘एका धारावीमुळे काय हालाहाल झाली, हे ईश्वरास ठाऊक’’ असे चिमाजी अप्पांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, त्यावरून हा किल्ला किती महत्त्वाचा होता याची सहज कल्पना येते, अशी माहिती किल्ल्यांचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दिली. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधल्याचे सांगितले जाते, परंतु हे सर्वस्वी चुकीचे असून किल्ल्याच्या बांधणीवरून तो मराठय़ांनीच बांधल्याचे सहज दिसून येते, असे राऊत म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारचे दुर्लक्ष
राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग याला किल्ला मानायलाच तयार नाही. त्यामुळे संरक्षित ऐतिहासिक वास्तूंमध्ये हा किल्ला येत नाही. याच कारणास्तव या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर झाडेझुडपे उगवली आहेत, बुरुजांचा वापर मौजमजा व मद्यपानासाठी केला जातो हे या ठिकाणी सापडलेल्या मद्याच्या बाटल्यांवरून स्पष्ट होते. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. संजय वर्तक व डॉ. स्वप्ना माळी यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथील सह्य़ाद्री मित्र मंडळ, विरार येथील स्वराज्य व मुंबईतील मालाडच्या श्री शिव संकल्प या दुर्गप्रेमी संस्थांच्या सदस्यांनी तब्बल आठ तास श्रमदान करून किल्ल्यातल्या दर्या-बुरुजाची साफसफाई केली. या ठिकाणी उत्खनन केल्यास इतिहासकालीन भांडी, नाणी तसेच इतर वस्तू हमखास सापडतील आणि इतिहासावर नवा प्रकाश पडेल, असा विश्वास श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केला आहे.

धारावी किल्ल्याची मजबूत तटबंदी आजही शाबूत आहे. दर्या बुरूज, थोडी तटबंदी व बालेकिल्ला बुरूज एवढेच सध्या या किल्ल्याचे अस्तित्व शिल्लक राहिले असले, तरी एकेकाळी सुमारे तीस ते चाळीस एकरावर हा किल्ला वसला होता. या संपूर्ण जागेची साफसफाई केली तर हे स्पष्ट होईल. किल्ल्याच्या परिसराची बारकाईने पाहणी केली तर सैनिकांच्या राहायची ठिकाणेदेखील या ठिकाणी होती व ती दुमजली असावीत, असे दिसून येते.
– श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharavi fort cleaned by history lovers