लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून शहरातील कापूरबावडी, माजिवडा आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर सुरु असलेली मेट्रोची कामे, वाहने बंद पडणे अशा विविध कारणांमुळे कोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले असून चित्रपटातील बालकलाकाराने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहीले आहे. शहरातील वाहतुक कोंडीवर उपाययोजना व्हावी अशी विनंती त्याने पत्रात केली आहे. अथर्व वगळ असे या बालकलाकाराचे नाव आहे. त्याने ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट’ ठाणे या चित्रपटात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालपणाची भूमिका बजावली आहे.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प प्रमाणे ‘मरीन ड्राईव्ह ते हाजीअली’ पर्यंत जसा भूमिगत मार्ग काढला व पुढे मार्गस्थ केला तशाच प्रकारे ‘माजीवाडा जंक्शन ते आनंद नगर’‘डी मार्ट’ ( घोडबंदर रोड ) पर्यंत वा पुढे ही होऊ घातलेला नवीन ‘ठाणे-बोरीवली’ प्रकल्प रस्ता किंवा आवश्यक असेल तिथ पर्यंत जर भूमिगत मार्ग काढला. तर शहरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल असा पर्यायही त्याने पत्रात सूचविला आहे.

ठाणे शहरात मेट्रोची कामे तसेच अरुंद रस्त्यामुळे दररोज कोंडीचा मन:स्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. माजिवडा, कापूरबावडी, घोडबंदर येथील वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कोंडी विषयी आता बालकलाकार अथर्व वगळ याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात अथर्व वगळ याने काम केले आहे.

या पत्रात त्याने म्हटले आहे की, मी अथर्व जयेश वगळ , ठाणे शहरात राहणारा बालकलाकार. मी माझ्या शालेय शिक्षणासोबतच मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका आणि जाहिराती, अभिनय क्षेत्रातही काम करून विविध सामाजिक विषयांवर उपक्रम राबवित आहे. ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया या शाळेत इयत्ता १० वीत शिक्षण घेत आहे. आजकाल ठाणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आम्हा शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून नोकरदार वर्ग, प्रवास करणारे नागरिक, वयोवृद्ध हे रोजच खूप त्रस्त होत आहेत, कारण शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम ही सुरु आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते अडवले आहेत. त्यातच माजीवाडा ते नाशिक महामार्ग रस्ता रुंदीकरण सुरू आहे. खारेगाव टोल नाक्यावरून अवजड वाहने घोडबंदर रोडकडे माजिवडा जंक्शन उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळवून मार्गस्थ होत होती, ती वाहतूक बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही सर्व वाहने माजिवडा उड्डाणपुलावरून सरळ पुढे जाऊन नितीन कंपनी उड्डाणपुला खालून वळण घेत पुन्हा माजीवाडा वरूनच पुढे जात आहेत.

त्यामुळे या ठिकाणी रोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कारण सर्वच अवजड वाहने मार्गिका नियम मोडून रस्त्यावर मधोमध उभी असतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होऊन हलक्या वाहनांना फटका बस आहे, प्रवाशांचा वेळही वाया जात आहे. अवजड वाहनांमुळे ठाणे शहरात ध्वनी व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच हीच वाहने या पद्धतीने जात असल्याने त्यांचे इंधन व वेळ ही विनाकारण वाया जात आहे. तेच जर पूर्वीप्रणाणे माजीवाडा उड्डाणपुला खालून पूर्ववत केली गेली तर या नितीन कंपनी जवळ पूर्ण वळसा घालून जी वाहने पुन्हा माजीवड्या जवळ पोहोचतात तितक्या वेळेत हीच अवजड वाहने सहजपणे सूरज वॉटर पार्कच्या पुढे जाऊ शकतात त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकते. याकडे आपण कृपया लक्ष द्यावे.

घोडबंदर परिसरात विकासकांकडून टोलेजंग गृहप्रकल्प निर्माण झालेले आहेत. अजूनही मोठे प्रकल्प निर्माण होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून या परिसरात लोकसंख्या व वाहनांची वर्दळ खूपच वाढली आहे. रस्त्यावर वाहनांची भर पडत असून वाहतूक वाढली आहे. त्यात मेट्रोची होत असलेली कामे त्यामुळेही वाहतुक कोंडी होत आहे. यावर एक उपाय म्हणून मुंबई कोस्टल रोड प्रकल्प प्रमाणे ‘मरीन ड्राईव्ह ते हाजीअली’ पर्यंत जसा भूमिगत मार्ग काढला व पुढे मार्गस्थ केला तशाच प्रकारे ‘माजीवाडा जंक्शन ते आनंद नगर’ ‘डी मार्ट’ पर्यंत, पुढे ही होऊ घातलेला नवीन ‘ठाणे-बोरीवली मार्ग’ प्रकल्प रस्ता किंवा आवश्यक असेल तिथ पर्यंत जर भूमिगत मार्ग काढला व काही मुख्य विविध याच मार्गांवर वाहनांना बाहेर पडण्यास मार्ग दिला तर निश्चितच कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल. जड- अवजड वाहने सहजपणे मार्गस्थ होऊ शकतील व हलकी तसेच इतरही भूमिगत मार्गे वाहतुक करू शकतील. प्रवाशांचा यामुळे वेळ, वाहनांचे इंधन देखील वाचेल असे पत्रात म्हटले आहे.