* स्वागतयात्रेत येऊरच्या पाडय़ावरील तरुणांचा सहभाग, मिरवणुकीतून समाजप्रबोधन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढीपाडव्यानिमित्ताने ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेच्या माध्यमातून विविधांगी असे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू असतानाच गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या येऊरच्या आदिवासी पाडय़ांमधील विद्यार्थी तसेच तरुणांना एकत्रित करत या भागातील समस्यांचे विदारक चित्रण अशाच स्वागतयात्रेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न यंदा येऊर तसेच आसपासच्या परिसरांतील संस्थांनी सुरू केला आहे. सोयीसुविधांच्या आघाडीवर ठाणे शहरात मूलभूत सोयीसुविधांचा सुकाळ असताना शहराचे पर्यटन केंद्र असा रुबाब मिरविणाऱ्या येऊरच्या आदिवासी पाडय़ांना मात्र वीज, पाणी आणि रस्ते अशा मूलभूत समस्यांचा आजही सामना करावा लागत आहेत. या समस्यांची सोडवणूक व्हावी आणि गतयात्रेच्या माध्यमातून त्या प्रकर्षांने मांडल्या जाव्यात असा प्रयत्न यंदा दिसणार आहे.
ठाणे शहराला खेटूनच आणि संजय गांधी उद्यानाचा भाग असलेल्या येऊरमध्ये एकूण सात आदिवासी पाडे आहेत. पाटोणापाडा, जांभूळपाडा, रोणाचा पाडा, नारळीपाडा, वणीचापाडा, भेंडीपाडा आणि पाटीलपाडा अशा सात पाडय़ांची नावे असून या पाडय़ांवर अडीच ते तीन हजारांची लोकवस्ती आहे. यापैकी बहुतेक पाडे वीज, पाणी आणि रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या पाडय़ातील आदिवासी बांधव आजही अंधारमय जीवन जगत आहेत. त्यामुळे पाडय़ांवरील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी तेथील आदिवासी बांधवांना एकत्र आणण्यासाठी पाडव्याच्या स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली. या यात्रेच्या माध्यमातून त्यांना सणांची संस्कृती माहिती व्हावी तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असा यात्रेमागचा उद्देश आहे, अशी माहिती सामजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी दिली.
येऊर येथील गावदेवी उत्सव मंडळातर्फे या स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ही स्वागतयात्रा निघणार आहे. पाटोणापाडा, जरीमरी आई मंदिर आणि गावदेवी मंदिर असा स्वागतयात्रेचा मार्ग असणार आहे. या यात्रेमध्ये जवळपास पाचशे ते सहाशे आदिवासी बांधव सहभागी होणार असून त्यामध्ये येऊरमधील महिला बचत गट, महिला मंडळे, शालेय विद्यार्थी आणि पुरुष आदींचा समावेश असणार आहे. पारंपरिक पोशाखामध्ये हे सर्व जण यात्रेत सहभागी होणार आहेत. येऊरमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या समाजप्रबोधनपर चित्रांच्या फलकांचा यात्रेत समावेश असणार आहेत. तसेच या स्वागतयात्रेच्या निमित्ताने गुढी उभारली जाणार आहे. याशिवाय, स्वागतयात्रेच्या समारोप कार्यक्रमामध्ये क्रीडा, चित्रकला तसेच अन्य स्पर्धामध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या येऊरमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhol tasha pathak thane