टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर विद्यामंदिर या शाळेने नुकतीच ६० वर्षे पूर्ण केली आहेत. २०१४-१५ हे वर्ष संस्थेने हिरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. या महोत्सवाचा सांगता सोहळा येत्या रविवारी ८ फेब्रुवारीला साजरा होत आहे. सायंकाळी ६ वाजता टिळकनगर विद्यामंदिराचे पटांगण, टिळकनगर, डोंबिवली (पू.) येथे होणाऱ्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सा धारणपणे ६४-६५ वर्षांपूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला शेती व खडकाळ जमीन असलेल्या जागेवर नवीन चाळीवजा इमारती उभ्या राहिल्या. एका नवीन विभागाची शहरात भर पडत होती आणि तीच टिळकनगर वसाहत. गिरगावातील काही मंडळींनी त्या काळात डोंबिवली नावाच्या खेडेगावात ३५-४० चाळी बांधल्या. या चाळींमध्ये कनिष्ठ मध्यम वर्गातील मंडळी एकोप्याने राहत होते. गोखले बिल्डिंगमध्ये राहणारे मितभाषी व दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे दिवंगत केशवराव खंडकर यांचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शन, तसेच राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दिवंगत व्यं. ल. जपे व साहित्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत दिवंगत सी. ल. देवधर या सर्वाची नियोजनबद्ध कार्यपद्धती व इतर टिळकनगर वासीयांच्या सहकार्यामुळे टिळकनगरची वसाहत एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे नांदू लागली.
सुरुवातीच्या काळात एकेक अडचणीवर मात करीत असतानाच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. मुलांना शाळेसाठी लांब जायला लागू नये म्हणून टिळकनगरमध्येच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगाने दिवंगत नानासाहेब देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होऊन १ जानेवारी १९५५ रोजी टिळकनगर बालविद्या मंदिर ही शाळा सुरू झाली. डोंबिवलीतील डोंबिवलीकरांनी सुरू केलेली ही पहिली शाळा. शाळा सुरू झाली, पण वर्ग भरवायचा कोठे हा यक्ष प्रश्न पुढे उभा ठाकला. या प्रश्नावर मात करून गोखले इमारतीच्या व्हरांडय़ामध्ये शाळा सुरू झाली. सुरुवातीला या शाळेत सुहास खंडकर, उल्हास देवधर, मधुकर पारखी, दिलीप कशेळकर, सुधीर दीक्षित ही पाच मुले होती. या विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांनी ११ वीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत पूर्ण केले. सुधीर दीक्षित हा विद्यार्थी दुर्दैवाने प्राथमिक शाळेत असतानाच कालावश झाला. या पाचही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकमेव शिक्षक होते ते म्हणजे तात्या मास्तर तथा शं. वि. कुलकर्णी. दरवर्षी एकेक वर्ग वाढत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येमध्येही वाढ होऊ लागली. वाढीव वर्ग टिळकनगरमधील रहिवाशांच्या घरामध्येच भरत असत. काका मास्तरांच्या मदतीला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी टिळकनगरमधील गृहिणी येऊ लागल्या. त्यात प्रामुख्याने इंदू जपे, सिंधु खंडकर, इंदू बापट यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. घरातील कामे आटपून त्यांनी विद्या दानाचे काम केले. विशेष म्हणजे त्यांनी विनावेतन काम करून शिक्षकांची उणीव भरून काढली.
१९५८ मध्ये सुरुवातीला ११०० वाराची जागा शाळेसाठी घेण्यात आली. टिळकनगरमधील रहिवाशी व डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहाय्यानेच ही जागा घेणे शक्य झाले. या जागेवर १९५८ च्या मे महिन्यात संस्थेच्या मालकीचे पहिले सभागृह बांधून पूर्ण झाले. या सभागृहाचे उद्घाटन डोंबिवली शहरातील प्रथितयश डॉ. मु. ल. जोशी यांच्या हस्ते झाले.
१९६० पासून माध्यमिक विद्यालयाचा प्रारंभ झाला. हळूहळू प्रगती करत शाळा दोन मजली झाली. नंतर नवीन वास्तू व पेंढरकर सभागृहामुळे टिळकनगर विद्यामंदिराचे डोंबिवली शहरातील स्थान मानाचे झाले. औद्योगिक विभागात शाळेची नवी वास्तू उभी राहिली. त्यात शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. आता साठाव्या वर्षांत नवीन प्रशस्त वास्तूची उभारणी पूर्णत्वास येत आहे.
सामाजिक बांधीलकी लक्षात घेऊन १९८० पासून शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध उपक्रम हाती घेतले. लोकमान्य टिळक व्याख्यानमाला, डोंबिवली सेवा पुरस्कार, तेजस पुरस्कार, स्वा. सावरकर पुरस्कार आदी त्यातील काही ठळक उपक्रम आहेत. अजूनही बऱ्याच गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्याचा संस्थेचा मानस आहे. अति दुर्गम ठिकाणी जाऊन तिथल्या मुलांना शालेय शिक्षण उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आमच्यासमोर आहे. टिळकनगरमध्ये
भव्य शैक्षणिक संकुल उभे करण्यासाठी तसेच मॅनेजमेंट कोर्स व विविध शाखांमधील अभ्यासक्रम येथे संस्थेला सुरूकरायचे आहेत. संगणकाच्या युगात ई लर्निगसारख्या माध्यमाचा अवलंब केला जाणार आहे. नव्या वास्तूमध्ये तशा प्रकारची सुविधा पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरूकरण्यात येणार आहे. मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमाची सुरुवातही बालवर्गापासून सुरू करण्याचा मानस संस्थेचा आहे. दृकश्राव्य माध्यमांच्या प्रयोगाद्वारे बालशिक्षण अधिक सुलभ होते. त्यामुळे सध्याच्या शिक्षण पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबरच एक सुसज्ज अभ्यासिका, पालकांसाठी समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन तसेच मुलांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर असे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. औद्योगिक क्षेत्रातील वास्तूत कनिष्ठ महाविद्यालयाबरोबरच पदवीपर्यंतचे महाविद्यालय सुरू करणे, नवीन तयार झालेल्या इमारतीमुळे शक्य होणार आहे. तसा संस्थेचा संकल्प असल्याचे, संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी सांगतात.
संस्थेचे माजी विद्यार्थी देशातच नाही तर विदेशातही मोठय़ा प्रमाणावर कार्यरत आहेत. हीरक महोत्सवी वर्षांत त्यांना एकत्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नव्या वास्तूच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांच्या सहकार्यातून विदेशातील एखाद्या प्रथितयश शिक्षण संस्थेबरोबर शैक्षणिक प्रकल्प साकार करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले माजी विद्यार्थी संदीप वासलेकर यांचा हीरक महोत्सवी वर्षांत विवेकानंदांच्या सार्धशतीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणारे रवी अय्यर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शर्मिला वाळुंज