आई, बाबा, दादा, वहिनी त्यांची दोन मुले अजूनही त्या दीड खणीच्या खोलीत राहतात. ती जागा त्यांनाच अपुरी पडते. मी आणि माझी फॅमिली कसे राहिलो असतो?
त्यामुळे आता सुरुवातीला विरोध करणारी आईसुद्धा ‘बरे झाले बाबा, तू वेळीच निर्णय घेतलास,’ असं म्हणते. आपण योग्य निर्णय घेतल्याबद्दल आता समाधान वाटत असले तरी खरं सांगू का? त्यात दूरदृष्टी वगैरे काही नव्हते. माझा अगदी नाइलाज होता. माझ्या त्यावेळच्या पगारात मी फक्त येथे बदलापूरमध्येच घर विकत घेऊ शकत होतो. दुसरा पर्यायच नव्हता.
अर्थात सुरुवातीला खूप त्रास झाला. कारण घर दादरला आणि नोकरी वरळीला. लोकल प्रवासाचा कधी संबंधच आला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळी परतीच्या प्रवासात सीएसटीहून गच्च भरून आलेल्या कर्जत आणि बदलापूर लोकल्स पाहून छातीत धडकीच भरली. दादरला चार गाडय़ा सोडल्या, तरी मला आत शिरता येईना. अगदी रडकुंडीला आलो. तेव्हा एका अनुभवी प्रवाशाने कानमंत्र दिला. माझे नवखेपण ओळखून त्याने मला कल्याण स्लो पकडून डोंबिवलीला जा आणि तिथूून बदलापूरला जाणारी गाडी पकडा. किंवा सीएसटीकडे जाणारी गाडी पकडून उलटे भायखळ्याला जा. तिथे बदलापूर-कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये किमान आत शिरता येईल, ही क्लृप्ती सांगितली. तो भला माणूस पुन्हा कधी भेटला नाही. मी त्याला शोधतोय. कारण गर्दीचे चक्रव्यूह भेदून बदलापूर गाठण्याचा उपाय सांगितल्याबद्दल त्या देव माणसाचे आभार मानायचे आहेत.
सुरुवातीला खूप त्रास झाला, पण आता सवय झाली. कारण आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे, हे पाहण्याची सवय लागली. इथे विजेचा लपंडाव होता. लाइट कधीही जात होती. दादरला या गोष्टीची सवय नव्हती. तिथे दीड खणीची खोली. इथे स्वतंत्र बेडरूम आणि बाल्कनी असलेला ६०० चौरस फुटांचा फ्लॅट. पाण्याची थोडी बोंब आहे, पण हवेशीर आहे. चाळवाले असल्याने फ्लॅट संस्कृतीचे थोडे टेन्शन होते. तिथे प्रायव्हसी हा शब्दच आमच्या शब्दकोशात नव्हता. सर्व मोकळा-ढाकळा कारभार. इथे फ्लॅटचे दार सदैव बंद. कुणी बेल वाजवली तरच ते उघडणार. मात्र ‘आपले घर भले आणि आपण’ हा सेल्फ कन्टेंडपणा फार काळ टिकला नाही. कारण आमच्या बिल्डिंगमधील बहुतेक सर्वच माझ्यासारखे मूळचे चाळकरीच आहेत. त्यामुळे येथेही चाळीतल्या सारखेच उत्सव उत्साहात साजरे होत असतात. आता थोडे डावे-उजवे तर सगळीकडेच असते. घरोघरी मातीच्या चुली. फ्लॅटसंस्कृतीही त्याला अपवाद कशी असेल? ‘पेला अध्र्या भरला आहे’ म्हणायचं आणि राहायचं. काय? परवा २६ जानेवारीच्या मिटिंगमध्ये मला सेकट्ररीपद मिळतेय. माझ्या वर्षभराच्या कार्यकाळात पाण्याचे आणखी एक कनेक्शन मिळवायचे ठरवलंय. पाहूया. सर्व मेंबर्सना विश्वासात घेऊन काम करणार आणि मिळालेले सेक्रेटरीपद सार्थकी लावणार.
– महादेव श्रीस्थानकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा