कल्याण- इंधनाचे गगनाना भिडलेले भाव, खिशाला असलेली कडकी आणि अशा परिस्थितीत आपण रात्रीच्या वेळेत आपला इच्छित प्रवास मोटारींमध्ये असलेल्या तुटपुंज्या डिझेलच्या साहाय्याने करू शकत नाही, याची जाणीव झाल्याने दोन मोटार चालकांनी आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने सोमवारी पहाटे डोंबिवली एमआयडीसीत एका कंटेनरच्या डिझेल टाकीतून २०० लीटर डिझेल काढून आपल्या मोटीरांमध्ये भरले आणि पळून गेले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी कंटेनर चालकाने तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन मोटार कारच्या वाहन क्रमांकावरुन त्यांच्या मालकांचा शोध सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणेकरांचा शहराबद्दलचा अभिमान वाढेल या उद्देशाने सौंदर्यीकरण; आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सुचना

हेही वाचा >>> डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

पोलिसांनी सांगितले, विजय वाघमारे हे खासगी नोकरी करतात. त्यांच्या मालकीचा एक कंटेनर आहे. सोमवारी त्यांनी कंटेनर मधून एमआयडीसीतील एका कंपनीचा माल बाहेरील राज्यातून आणला होता. माल कंपनीत उतरविण्यासाठी उशीर लागणार असल्याने कंटेनरचे चालक विजय वाघमारे यांनी डोंबिवली एमआयडीसी टप्पा एक मधील अलकेमी फाईन केम कंपनीच्या बाहेरील रस्त्यावर आपला कंटेनर उभा करून ठेवला होता. कल्याण पूर्वेत घर असल्याने ते रात्री निवासासाठी घरी गेले होते. सकाळी ते पुन्हा कंटेनर उभा केल्याच्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांना वाहन चालू होत नसल्याचे आढळले. तांत्रिक पाहणी केली त्यावेळी त्यांना काही दोष आढळून आला नाही. त्यांनी डिझेल टाकी तपासली त्यावेळी त्यांना टाकीमध्ये डिझेलचा एक थेंब नसल्याचे दिसले. डिझेलची टाकी भरलेली असताना रात्रीतून डिझेल खाली कसे झाले. वाहनाच्या खाली गळती होऊन डिझेल सांडले नसल्याचे दिसले.

हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

कंपनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असताना त्यामध्ये एमएच०२-बीजी-०२७८, एमएच-०४-४०८८ या दोन मोटार कार मधील दोन चालक आणि त्यांचे दोन सहकारी कंटेनरच्या डिझेल टाकीतून डिझेल काढून स्वताच्या वाहनांमध्ये भरत असल्याचे दिसले. डिझेलची चोरी झाल्याचे समजल्यावर वाघमारे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरुध्द तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत एमआयडीसीतील तांबे, पितळ चोरणाऱ्या चोरट्यांनी एमआयडीसीतील रस्त्यांवर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनांमधील डिझेल चोरीला सुरूवात केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diesel theft two motor car drivers dombivli midc fuel ysh