ठाणे: भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय कापूस निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार होती. परंतु जिल्हा प्रशासनाच्या संथ कारभारामुळे गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांच्या मदतीने देहविक्री करणाऱ्या महिलांचे मतपरिवर्तन करण्यात आले होते. यामुळे अनेक महिलांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार होता. परंतु गेले अनेक महिने हा प्रकल्प रखडल्याने सामाजिक संस्थांपुढे पेच निर्माण झाला आहे.
भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांच्या पुनर्वसनासाठी हनुमान टेकडी परिसरात काही सामजिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचा माध्यमातून या महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. याच सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हा महिला बालविकास विभागामार्फत या परिसरात वैद्यकीय कापूस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार होता. यासाठी लागणारी यंत्रसामग्री, जागा याची पूर्तता देखील करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांचे मतपरिवर्तन करण्याचे काम सामाजिक संस्थांनी केले होते. त्यासाठी संस्थांना मोठी कसरत करावी लागली.
हेही वाचा… कल्याणमध्ये गणपती कारखान्याच्या मालकाला सापाड गावातील तरुणांची मारहाण
दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पाची सुरुवात होणे अपेक्षित होते. यामुळे सामाजिक संस्था आणि देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये पुनर्वसनाबाबतची एक नवी आशा निर्माण झाली असती. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या संथ कारभारामुळे हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. यामुळे सामाजिक संस्थांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तातडीने हा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी या संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या बाबत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
प्रकल्प काय?
या प्रकल्पाद्वारे वैद्यकीय कापूस निर्मिती केली जाणार आहे. याची विक्री जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच काही औषधालय याठिकाणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याचे नियोजन केले जाणार आहे. याद्वारे देहविक्री करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन होणार असून त्याचे अर्थार्जन देखील होणार आहे.