जुन्या-नव्या ठाण्यात वारंवार वीजपुरवठा खंडित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : चढत्या पाऱ्यामुळे त्रस्त झालेले ठाणेकर सध्या वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे मेटाकुटीला आले आहेत. आधीच जुनाट झालेल्या वीजवाहिन्या ठिकठिकाणच्या खोदकामांमुळे खिळखिळ्या झाल्या आहेत. याचे चटके ठाणेकरांना बसत आहेत. नौपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, यशोधननगर, शास्त्रीनगर, घोडबंदर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या आठवडय़ाभरापासून तापमानाचा पारा चाळिशी गाठत आहे. वातानुकूलन यंत्र, पंखे, रेफ्रिजरेटरशिवाय राहणे अशक्य झाले असताना ठाण्याच्या अनेक भागांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. नौपाडा येथील गोखले मार्ग, स्थानक परिसर, हरिनिवास, खोपट या भागांत दिवसाला किमान अर्धा ते एक तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, डवलेनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर आणि उपवन या भागांतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. जुन्या शहराच्या तुलनेत येथील स्थिती बरी आहे, असे वीज कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे.

नवे ठाणे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरच्या अंतर्गत भागांत लोकवस्ती मोठय़ा प्रमाणावर वाढली रहिवाशांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील माजिवडा, कापूरबावडी, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवडवलीत आठवडय़ाभरापासून वीजपुरवठा खंडित होत आहे.

जुन्या व्यवस्थेवर ताण

* ठाणे शहरातील वीज वितरण व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची आवश्यकता यापूर्वीही व्यक्त करण्यात आली आहे. मूळ शहरातील वीजवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. विजेची मागणी वाढली की बिघाड वाढतात, असा काही वर्षांतील अनुभव आहे.

* हरिनिवास, घंटाळी मार्ग, बी-केबिन मार्ग या भागांत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. तर लोकमान्यनगर, डवलेनगर परिसरात वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ज्ञानेश्वरनगर नाका ते इंदिरानगर नाका रस्त्याचे क्राँक्रीटीकरण आणि रुंदीकरण सुरू आहे. याचा फटका भूमिगत वीजवाहिन्यांना बसत आहे.

* घोडबंदर मार्गावर मेट्रो आणि सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे महावितरण कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी दिली.

काही तांत्रिक कारणांमुळे तसेच महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ते दुरुस्ती कामांमुळे वीजवाहिन्या नादुरुस्त होत आहेत. आमचे अधिकारी-कर्मचारी बिघाड दूर करून ताबडतोब वीजपुरवठा सुरळीत करतात. खोदकाम करताना वीजवाहिन्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी महावितरणचे अभियंते घेतात.

– पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता, भांडूप नागरी परिमंडळ