लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : डोंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कळवा-मुंब्रा विधासभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या नियुक्त्या केल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.

डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र जिल्हा संघटकपदी ज्येष्ठ निष्ठावान व माजी नगरसेवक तात्या माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. येत्या काही महिन्यात महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर शिवसेनेची घट्ट बांधणी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे संघटन करण्यासाठी रखडलेल्या नियुक्त्या, रिक्त पदांवर पदाधिकारी नियुक्तीचे काम सुरू केले आहे.

दीपेश म्हात्रे कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक, युवा सेना अध्यक्ष, स्थायी समितीचे सभापती होते. गेल्या वर्षीची डोंबिवली विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजप उमेदवार रवींंद्र चव्हाण यांच्या विरुध्द लढवली होती. आगरी समाजातील एक उमदा चेहरा डोंबिवली, कल्याण परिसरात हाती आल्याने ठाकरे गटाने दीपेश म्हात्रे यांना तीन विधानसभांच्या प्रमुख पदी नियुक्त केले आहे. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात आगरी समाजासह विविध ज्ञाती समुहांना एकत्र आणून पालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समाज घटकांचे संघटन करण्याची मोठी जबाबदारी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यावर असणार आहे. दीपेश यांचे वडील माजी महापौर पुंडलिक म्हात्रे राजकारणात पूर्णवेळ सक्रिय असताना त्यांची डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागावर हुकमत होती. त्या स्नेहसंबंधाचा दीपेश म्हात्रे यांना कार्यकर्त्यांचे संघटन करताना उपयोग होणार आहे.
डोंबिवली शहरातील नागरी विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून दीपेश म्हात्रे पालिका, शासन पातळीवर प्रयत्नशील आहेत.

तात्या माने ज्येष्ठ निष्ठावान शिवसैनिक आहेत. विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल झाले. तात्या माने यांनाही शिंदे गटाकडून पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिले.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करून आपल्यावर पक्षाची एक मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. शहरांमधील नागरी विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबर, पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असणार आहे. -दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, डोंबिवली विधानसभा क्षेत्र.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dipesh mhatre from dombivli appointed as assembly constituency district chief of shivsena uddhav balasheb thackeray mrj