माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे मत
शहरातील प्रत्येक प्रभागातील मतदाराने मतदान करून निवडून दिलेल्या नगराध्यक्षांची तेथील नागरिकांसोबत बांधिलकी राहते. विकासकामे करताना संपूर्ण शहराचा विचार नगराध्यक्षाकडून केला जातो. असमतोल विकासाला गढूळ राजकारणामुळे खतपाणी घातले जाते. तो प्रकार थेट नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत थांबतो. त्यामुळे ‘सुंदर नगरी’ (स्मार्ट सिटी) सारख्या शहर विकासाच्या संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी राज्य सरकारने जनतेमधून थेट नगराध्यक्षपद निवडीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे डोंबिवली नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष श्रीपाद तथा आबासाहेब पटवारी यांनी सांगितले.
डोंबिवली नगरपालिका अस्तित्वात असताना १९७४ मध्ये जनतेमधून निवडून गेलेले पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान आबासाहेब पटवारी यांना मिळाला होता. १९७४ मध्ये राज्य सरकारने नगरसेवकांमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक करण्यापेक्षा थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पहिला लाभ पटवारी यांना झाला. थेट जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर नगरपालिकेत काम करणे सोयीचे असते असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहिवाशांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा घेतलेला निर्णय आणि साधलेली वेळ योग्य आहे, असेही ते म्हणाले.
रहिवाशांमधून थेट नगराध्यक्ष निवडताना प्रत्येक प्रभागातील मतदारांना दोन मते देण्याचा अधिकार असतो. एक मत प्रभागातील नगरसेवकाला आणि दुसरे मत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला द्यावयाचे असते. शहर विकासाला साजेशा आणि रहिवाशांच्या मनातील उमेदवार थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा राहिला तर शहराच्या विकासाला गती मिळते, असा दावा त्यांनी केला. शहरातील प्रत्येक प्रभागातील मतदाराने मतदान करून निवडून आलो आहोत, याचे भान जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षला असते. त्यामुळे तो नगराध्यक्ष केवळ एका प्रभागापुरता मर्यादित राहात नाही, असा दावाही त्यांनी केला. अलीकडे नगरसेवक आपल्या प्रभागापुरता विकासाचा विचार करतो. तशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. थेट नगराध्यक्षाला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. या कालावधीत नगराध्यक्षपदासाठी आपली कधी वर्णी लागणार नाही याची जाणीव झाल्याने कोणीही राजकीय प्रतिस्पर्धी कुरापती न करता आहे, त्या व्यवस्थेशी जुळवून घेऊन कार्यरत राहतो, असा दावा पटवारी यांनी केला. आपल्या कारकीर्दीत कोपर उड्डाण पूल, भावे सभागृह, डोंबिवली ग्रंथसंग्राहलय इमारत, शास्त्रीनगर रुग्णालय, पालिकेची वास्तू अशी आखीवरेखीव कामे उभी राहिली. विशेष म्हणजे ही कामे पूर्ण करण्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग होता, असे पटवारी म्हणाले.
थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सतीश प्रधान यांनी ठाण्यात, कल्याणमध्ये भगवानराव जोशी यांनी शहराला दूरगामी लाभ मिळवून देणारी विकासकामे करून ठेवली. सर्वपक्षीय नगरसेवकांचा निर्णय नगराध्यक्षला पटला नाही तर याबाबत राज्य सरकारला पालिकेच्या कारभाराबाबत कळविण्याचा अधिकार नगराध्यक्षला होता. उपाध्यक्ष निवडण्याचे अधिकार नगराध्यक्षाला होते. नगराध्यक्षाला अधिकाराचा विचार करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आदरभावनेने, शहराच्या विकासाचा विचार करून कारभार करत असे पटवारी यांनी सांगितले.

Story img Loader