शरीराने साथ दिली नाही तरी मनाच्या उभारीने आम्ही सर्व समस्यांवर मात करूशकतो. परंतु अनेकदा मनाची ही उभारी कमी पडते. अशा वेळी अपंग व्यक्तींना ‘भरारी’सारख्या संस्थांचा आधार मिळतो. गेली काही वर्षे सातत्याने शहर परिसरातील अपंगांना आधार देणाऱ्या भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्थेचा १९ वा वर्धापन दिन येथील स्वयंवर सभागृहात साजरा झाला. त्यानिमित्त अपंगांच्या विविध स्पर्धा पार पडल्या. तसेच अपंगत्वावर मात करीत अंगभूत कलागुणांचा विकास कसा केला, याचा उलगडा अनेकांनी कलेच्या माध्यमातून साकारला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आबा पटवारी व आर्थोपेडिक शल्यविशारद डॉ. आमोद काळे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने दरवर्षी अपंगत्व असूनही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्यात येतो. यंदा ‘मेक माय ड्रिम फाऊंडेशन’च्या मेघा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. मेघा या स्वतच्या अपंगत्वावर मात करीत समाजातील निम्नस्तरातील अपंगांना स्वावलंबनातून आत्मनिर्भर होण्यास मदत करीत आहेत. भरारी संस्थेचे कार्य पाहून पुण्यातही असे उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाल्याचे मेघा यांनी या वेळी सांगितले. तर डॉ. आमोद काळे यांनी संस्थेचे कार्य खरोखरीच उल्लेखनीय असून अशा कार्यक्रमातून एक वेगळी ऊर्जा मिळते असे सांगितले.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक दिवंगत विजय प्रधान यांना नृत्य व चित्रफितीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली, तर नाऱ्हेणे गाव येथे घेतलेल्या भरारी संस्थेच्या जागेवर इमारतीचे काम पूर्ण करून तिथे अनेक उपक्रमांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. विनायक मालवणकर यांनी सांगितले.

Story img Loader