ठाणे : नौपाडा येथील गावदेवी भागात मूक आणि अपंग मुलीची आई आणि आजीने हत्या केल्याचे प्रकरण समोर येत आहे. मुलीच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी ही हत्या केली आहे. हत्येनंतर त्यांनी मुलीच्या प्रेताचे वाई येथे अंत्यसंस्कार देखील केले. याप्रकरणात पोलिसांनी मुलीच्या आजीला अटक केली आहे. तर तिच्या आईचा पोलीस शोध घेत आहेत.गावदेवी मंदिर परिसरात १७ वर्षीय मुलगी तिचे आई, वडिल आणि आजी सोबत राहात होती. मुलगी जन्मताच मूक आणि अपंग असल्याने ती अंथरूणावर खिळून असे. मुलगी आणि तिची आई गुरुवारपासून अचानक गायब झाली होते. त्यामुळे तिचे नातेवाईक तिच्या वडील आणि आजीकडे चौकशी करत होते.

परंतु मुलीला उपचारासाठी वाई येथे नेण्यात आल्याचे तिच्या कुटुंबाकडून सांगितले जात होते. दरम्यान, रविवारी त्यांच्या नातेवाईकांच्या मोबाईल क्रमांकावर एक सीसीटीव्ही चित्रीकरण प्राप्त झाले. त्यामध्ये आजी, मुलीची आई आणि मुलीच्या आईची मैत्रिण एका पांढऱ्या कपड्यामध्ये मृतदेह नेत असल्याचे दिसले. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी तात्काळ याप्रकरणात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आजीला ताब्यात घेऊन अटक केली. १५ फेब्रुवारीपासून मुलीची प्रकृती ढासळत होती. त्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या. रात्री-अपरात्री ती आरडाओरड कर असे. या त्रासाला कंटाळून तिच्या आईने तिला कसले तरी औषध दिले. हे औषध घेतल्याने तिचा मृ्त्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसले

मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मुलीची आईने एक मोटार नोंद केली होती. मोटार घराबाहेर आल्यानंतर तिघींनी तिचा मृतदेह बाहेर काढून मोटारीत भरला. आजी आणि आई देखील मोटारीत बसले. ते वाई येथे पोहचल्यानंतर एका स्मशानभूमीत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन ते चार दिवस उलटूनही एका मुलीची हत्या झाल्याबाबत कोणतीही माहिती नव्हती. परंतु सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर हा हत्येचा प्रकार समोर आला आहे.

Story img Loader