कल्याण – महिलांना शिलाई यंत्र, घरघंटी वाटप ही केंद्र सरकारची पंतप्रधान खनिज क्षेत्र योजनेतील योजना असतानाही, या योजनेच्या कार्यक्रमात शिवसेनेने डावलल्याने कल्याण, डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीतून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींंद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतील चक्की नाका कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींची पण, तोरा मात्र शिंदेंचा अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे लाभार्थी महिलांना शिलाई यंत्र, घरघंटी देण्याचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात आयोजित केला आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरून देण्याचे काम पालिकेसह शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेत कल्याण डोंबिवली पालिकेने ‘खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून’ लाभार्थींना घरघंटी, शिलाई यंत्राचे वाटप उल्लेख केल्याने भाजपचे डोंबिवली, कल्याणमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने त्यांच्याकडे लाभार्थींची संकलित झालेली माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून कल्याण, डोंबिवलीतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना मंगळवारी संध्याकाळी पाठविण्यात आली. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी प्रभागातील लाभार्थी महिलांना चक्कीनाका येथील कार्यक्रमाला हजर राहण्याचे कळविले. या सगळ्या प्रकारामुळे भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युती म्हणून सर्व कार्यक्रमांमध्ये एकत्र यायचे आणि आयत्यावेळी श्रेय घेण्यासाठी त्या कार्यक्रमांमधून भाजपला डावलायचे हे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया भाजपच्या कल्याण, डोंबिवलीतील पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिल्या.

हेही वाचा – ठाण्यात राहुल गांधी येताहेत पण, पत्रकार परिषद भलतेच घेताहेत; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप

मंत्री चव्हाण यांची पाठ

कल्याण पूर्वेत चक्की नाका येथील कार्यक्रमात शिलाई यंत्र, घरघंटी वाटप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार होते. मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही घडला प्रकार समजल्याने त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मिळालेल्या सापत्न वागणुकीविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून चक्की नाका येथील शिलाई, घरघंटी वाटप कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

चक्कीनाका येथील कार्यक्रम कल्याण डोंबिवली पालिकेचा आहे. त्यामुळे याठिकाणी काय झाले आहे. ते माहिती नाही. – नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप कल्याण जिल्हा.

हेही वाचा – ‘मुह मे मोदी और ठाण्यात भाजप बेनाम’, आमदार संजय केळकर यांची टीका

कार्यक्रम पालिकेचा आहे. त्यात सर्वांना निमंत्रणे दिली आहेत. याठिकाणी दुजाभावाचा प्रश्न येत नाही. गोपाळ लांडगे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

चक्कीनाका कार्यक्रमाची आमंत्रणे सर्व राजकीय, प्रमुख मंडळींना दिली आहेत. यामध्ये कोणीही नाराज असण्याचे कारण नाही. – वंदना गुळवे, सचिव,
कडोंमपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discontent among bjp workers in kalyan dombivli after shivsena ignored bjp in pm modi scheme program ssb