डोंबिवली : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गोंधळसदृश्य परिस्थितीवर डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या चालकांनी ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आपल्या शालेय बसवर फलक लावले आहेत. हे फलक डोंबिवली शहर परिसरात चर्चेचे विषय ठरले आहेत. डोंबिवलीतील खड्डे, रस्ते, अराजक परिस्थितीवर विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित नेहमी शाळेच्या बसवर फलक लावून त्यामधून आपल्या भावना व्यक्त करतात. हा फलकाचा विषय शहर परिसरात चर्चेचा विषय होतो. गेल्या वर्षी शहरातील खड्ड्यांचे विदारक चित्र, प्रशासकीय ढिसाळपणा यावर फलकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नऊ ऑगस्ट बुधवारी क्रांतिदिन असल्याने विद्यानिकेतन शाळेच्या बसच्या पाठीमागील भागात राज्यातील अराजकसदृश्य राजकीय परिस्थिती आणि जनता कशी बेघर, बेहाल झाली आहे याचे मार्मिक भाष्य केले आहे. अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या विवेक पंडित यांनी फलकांच्या माध्यमातून संदेश दिले तरी त्यावर भाष्य कोणाची हिम्मत होत नाही. सर्व राजकीय मंडळी त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यामुळे फलकाच्या माध्यमातून योग्य संदेश जात असल्याने यावेळी क्रांतिदिनाचे औचित्य साधून पंडित यांनी राजकीय विषयावर भाष्य करणारे फलक शालेय बसच्या मागे लावले आहेत.

हेही वाचा >>> जंगलव्याप्त गावातील विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; म्हणतात, “बसेस वेळेवर पाठवा”

बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी, उतरण्यासाठी थांब्यावर थांबली की पादचाऱ्यांची तो फलक वाचण्यासाठी गर्दी जमत आहे. डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसना ट्विटर बस, संदेश बस म्हणून ओळखले जाते. ‘राज्यात शासनकर्ता कोण, प्रशासक कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भ्रष्टाचारासाठी सर्व राजकीय मंडळी आपल्या निष्ठ, सूचिता सोडून कट करुन एक झाली आहेत. पक्षांमध्ये एकसंधता नाही. सर्वत्र भेदाभेदीचे वातावरण आहे. या सगळ्या गोंधळात महागाईने भरडलेला, पिचलेला सामान्य नागरिक मात्र बेघर, बेहाल झाला आहे. कृष्ण अस्तित्वात नसताना आज राज्यात महाभारत घडत आहे. राजा कोणीही असेल, पण रंक म्हणून शेवटी प्रजेकडे पाहिले जाते,’ असे या फलकावरील संदेशात म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion of the plaque on the vidyaniketan school bus ysh
Show comments