ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक संजय भोईर यांनी मतदारसंघात फलकाबाजी करून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिंदे गटाला आता केळकर यांचा प्रचार करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे विधानसभा मतदार संघामध्ये जुन्या ठाणे शहरातील जुन्या आणि नव्या ठाण्याचा काही भाग येतो. या मतदारसंंघात संजय केळकर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ विधानसभा निवडणूकीत एकसंघ शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. या निवडणूकीत शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपने संजय केळकर यांना रिंगणात उतरविले होते. या निवडणूकीत संजय केळकर यांनी फाटक यांचा पराभव करत शिवसेनेला एकप्रकारे मात दिली होती. ठाणे हातातून गेल्याने हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. २०१९ मध्ये शिवसेना भाजपची युती होती. त्यावेळी या मतदारसंघात भाजपने पुन्हा केळकर यांना उमेदवारी दिली. यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत होती. संजय केळकर यांच्याविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव हे निवडणूक लढत होते. युती असतानाही अविनाश जाधव यांचा केवळ सुमारे २० हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधव यांना छुपी साथ मिळाल्याची चर्चा रंगली होती.

हे ही वाचा…मुरबाडमध्ये किसन कथोरेच भाजपचे उमेदवार; पक्षाअंतर्गत विरोधकांची कोंडी, पक्षांतरांच्या चर्चांनाही पूर्णविराम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातील हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे ढोकाळी-कोलशेत भागातील माजी नगरसेवक संजय भोईर यांचे फलक संपूर्ण शहरात झळकत होते. हा मतदारसंघ भाजपने सोडावा अशी चर्चा शिंदे गटाचे पदाधिकारी करत होते. संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अखेर चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion on candidature of thane assembly constituency stopped bjp announced candidature of sanjay kelkar sud 02