ठाणे: ठाणे शहरात वाहतूक कोंडी बरोबरच अनेक समस्यां आहेत. यावर महापालिका प्रशासनाने सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शहराची लोकवस्ती वाढल्याने तेथील वाहनांची संख्या वाढते. अशावेळी महापालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी वाहनतळ उभारणे, अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनस उभारण्याची गरज आहे. मात्र ठाणे महापालिकेकडून यासर्व गोष्टी उभारण्यात उशीर होत आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे, फेरीवाल्यांवर कारवाई करणे, राखीव भूखंडाचे संरक्षण करणे अशा पद्धतीची कामे करण्यात महापालिका प्रशासन कायम दिरंगाई करते. यामुळेच शहराचे विद्रुपीकरण झाले असल्याचे सांगत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.
ठाण्यातील वाहतूक कोंडी समस्यांसंदर्भात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखा उपायुक्त आणि अधिकारी यांच्यासमवेत गुरुवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच या बैठकीकादरम्यान केळकर यांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज दहा लाखाहुन आधिक प्रवासी ये-जा करतात. ठाणे रेल्वे स्थानकात असलेल्या रिक्षाचालकांची अरेरावी, भाडे नाकारणे यांसारख्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत असतात. मात्र यांच्यावर कारवाई संथगतीने होते. त्यात वाहतूक पोलिसांनी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने कठोरता आणायला हवी. शहरात सुमारे हजारोंच्या संख्येने रिक्षा धावत असून त्यांच्या नियोजनाचा यक्ष प्रश्न ठाण्यासमोर आहे. असे मत केळकर यांनी यावेळी व्यक्त केले. सॅटिस पुलाखालून विविध मार्गवार रिक्षा जातात. मात्र यावेळेस रिक्षाचालकांची मोठया प्रमाणात अरेरावी होतांना दिसून येते. यासाठी स्थानक परिसरात चोवीस तास एक पोलीस चौकी सुरु करण्यात येणार आहे. तसेच ठाणे महापालिकेतर्फे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याने देखील अनेक समस्यां निर्माण होतात. पोलीस चौकी सुरु झाल्यास यासर्वांना आळा बसणार आहे. यासाठी प्रवासी आणि रिक्षा संघटना तसेच पोलीस यंत्रणा यांचा समन्वय साधुन या समस्यां सोडविण्यात येतील. तसेच येत्या आठवड्यात याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन रेकी करून वाहतूक कोंडी कशी सोडविता येईल याचे नियोजन करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले ट्रक टर्मिनस उभारण्यात यावे. अशी मागणी केळकर यांनी यावेळी महापालिकेकडी केली. तसेच महापालिका प्रत्येक कामात दिरंगाई करत असल्यानेच शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. असा आरोपही केळकर यांनी यावेळी पालिका प्रशासनावर केला.
येईल त्याला रिक्षा परवाना अयोग्य
मागील काही वर्षात येईल त्याला रिक्षा परवाना हे धोरण राबविण्यात आले. यामुळे रिक्षांची संख्या वाढली. शहरावर या वाहनांचा भार पडत आहे. यामुळे या धोरणात बदल करण्यासाठी शासनाशी चर्चा करण्यात येईल असेही केळकर यांनी सांगितले.