डोंंबिवली – येथील पूर्व भागातील सुनील नगरमधील ग प्रभाग कार्यालयासमोरील रस्ते, गटाराला बाधा न येणारे बहरलेले गुलमोहराचे जुने झाड तोडण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुनीलनगर भागात एमएमआरडीएच्या निधीतून काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे करताना जुनाट झाडांना बाधा येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सुनीलनगर भागात जुनाट वड, पिंपळ, गुलमोहाराची झाडे आहेत. या झाडांमुळे या भागात हिरवाई आहे. काँक्रीट रस्ते कामे करताना एमएमआरडीएच्या ठेकेदाराने काही झाडे वाचविण्याचा प्रयत्न करून रस्त्यांना वळण देऊन कामे पूर्ण केली आहेत, असे स्थानिकांनी सांगितले. पालिकेच्या उद्यान विभागाकडूनही अनावश्यक पद्धतीने, पालिकेच्या परवानग्या घेतल्याशिवाय झाडे तोडू नयेत, अशा सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत.
हेही वाचा – टोमॅटो ६० रुपयांवर; भाज्याही महाग, दर ८० रुपयांपर्यंत
या भागातील काँक्रीट, गटाराची कामे पूर्ण झाली असताना ग प्रभाग कार्यालयासमोरील रस्ते, गटाराला अडथळा न ठरणारे झाड तोडण्यात आल्याने रहिवाशांंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँक्रीट रस्ते कामांसाठी शहराच्या विविध भागांतील झाडे तोडली जात आहेत. या झाडांच्या बदल्यात पालिकेला महसूल आणि एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे ठेकेदाराकडून लावून घेतली जात आहेत. तरीही एक झाड पूर्ण वाढीसाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी जातो. तोपर्यंत तो परिसर उजाड राहतो, असे रहिवाशांनी सांगितले.
डोंबिवली शहरात गांधीनगर, ब्राम्हण सभा टिळक रस्ता, सुनीलनगर, एमआयडीसी अशा ठराविक भागात जुनाट झाडे शिल्लक आहेत. ही झाडेच आता शहराचा प्राणवायू आहेत. त्यामुळे या झाडांची कत्तल होणार नाही याची काळजी पालिकेने घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.
हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील सोसायटीधारकांचे भाडे करार वाढणार
यासंदर्भात पालिकेचे उद्यान विभागाचे अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले, सुनीलनगरमधील संबंधित झाड धोकादायक झाले होते. वर्दळीच्या रस्त्यावर हे झाडे होते. याविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. धोक्याचा विचार करून हे झाड तोडण्यात आले आहे. या भागात इतर झाडे लावण्याचे नियोजन आहे.