शहरातील रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेत गेलेल्या स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासोबत गेलेल्या काही माजी नगरसेवकांनी रखडलेल्या कामांवरून पालिका कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी एका माजी नगरसेवकाने अधिकाऱ्यांना धारेवर धरताना अपशब्दाचा वापर केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्याविरूद्ध बुधवारी कर्मचाऱ्यांनी काही वेळ लेखणी बंद आंदोलन करून निषेध केला. या नगरसेवकाविरूद्ध पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींचा पालिकेशी थेट संबंध येताना दिसत नाही. त्याचवेळी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर सातत्याने शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालिकेत जात असतात. काही गेल्या आठवड्यात डॉ. किणीकर आपल्या काही माजी नगरसेवकांसह शहरात रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी डॉ. किणीकर यांनी पालिकेच्या कारभारावरून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी काही माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावताना अपशब्द उच्चारले. यामुळे अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तर हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. त्याविरूद्ध अधिकाऱ्यांमध्ये खदखद होती. त्यामुळे बुधवारी दुपारनंतर काही वेळासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. यावेळी काम बंद ठेवत माजी नगरसेवकांच्या अरेरावीचा निषेध करण्यात आला. काही वेळाने पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानतंर कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आपले आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा : डोंबिवलीतील पुसाळकर उद्यानात येणाऱ्या नागरिकांना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना
मात्र यापुढे लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे समस्या मांडताना भान ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. तर आमदार डॉ. किणीकर यांनीही या संबंधित नगरसेवकाला यापुढे भान बाळगण्याचे आवाहन केले आहे.अधिकाऱ्यांवर अंकूश नाहीगेल्या २८ महिन्यांपासून अंबरनाथ नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवरचा वचक कमी झाला आहे. परिणामी अधिकारी माजी नगरसेवकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत असा आरोप लोकप्रतिनिधींकडून केला जातो आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना उफाळून येत असल्याची प्रतिक्रिया एका माजी नगरसेवकाने खासगीत दिली आहे.