कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील खैरेपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी (३५) या भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
शहापूर तालुक्यातील भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संजय अधिकारी यांची ओळख होती. सरळांबे ग्रामपंचायत आणि परिसरातील सामाजिक कार्यात संजय आघाडीवर असायचे. कपील पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी शहापूर तालुक्यात प्रचाराचे काम केले होते. एका पायाने अपंग असुनही त्यांची पक्ष कार्यासाठीची धडपड कौतुकास्पद होती.
हेही वाचा…घोडबंदर मार्गवर आज सायंकाळपासून कोंडीमुक्ती, घाट रस्त्याचे काम पूर्ण होणार
भिवंडी लोकसभेत कपिल पाटील पुन्हा खासदार म्हणून निवडून जावेत यासाठी संजय अधिकारी यांची धडपड होती. भाजप कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शहापूर तालुका पिंजून काढला होता. मतमोजणीच्या दिवशी कपील पाटील यांचे पक्ष प्रतिनिधी म्हणून संजय अधिकारी यांना ओळखपत्र मिळाले होते. पण मतमोजणीच्या दिवशी ते गैरहजर राहिले. त्यानंतर कपील पाटील पराभूत झाल्याची माहिती मिळताच, संजय खूप व्यथित झाले. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.
रात्रीच्या वेळेत मित्रांसोबत चर्चा करत असताना आता जगण्यात काही अर्थ नाही, अशी भाषा त्यांनी केली होती. मित्रांनी त्यांना समजावले होते. असे टोकाचे पाऊन न उचलण्याचे सूचित केले होते. बुधवारी रात्री पत्नी, त्याची दोन मुले घरात झोपी गेल्यानंतर संजयने राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीला आला.
हेही वाचा…महामार्गावर पाच वाहनांची एकमेकांना धडक; दोनजण जखमी
आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची माहिती मिळताच कपिल पाटील यांचे कौटुंबिक सदस्य देवेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी अधिकारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संजय यांच्या कुटुंबीयांना कपील पाटील फाऊंडेशनतर्फे सहकार्य केले जाणार आहे.