ठाणे: अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ किटच्या वाटपास गुरुवारी ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली. शहरी भागातील वाटपाची सुरुवात नौपाडा येथील शिधा वाटप केंद्रात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आली . याबरोबरच ग्रामीण भागातही शिधा वाटप केंद्रावरून किटचे वाटप सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याण मधून फेरीवाले गायब; रस्ते, पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान
हेही वाचा >>> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संजय घाडीगावकर यांचा जाहीर प्रवेश
दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या वतीने शिधावस्तूंचा संच शंभर रुपये प्रति संच या दराने अधिकृत शिधावाटप दुकानांमधून वितरीत करण्यात येणार आहे. जे शिधापत्रिकाधारक सध्या बायोमेट्रिक पध्दतीने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब या योजनेअंतर्गत शिधाजिन्नस प्राप्त करीत आहेत, त्यांना या आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे. या संचामध्ये एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो रवा आणि एक लिटर पामतेल या वस्तूंचा समावेश आहे. ठाणे परिमंडळातील उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर इत्यादी महानगर तसेच नगरपालिका क्षेत्रात या किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ हजार ४८८ अंत्योदय आणि ५ लाख ९९ हजार ८७५ प्राधान्य शिधापत्रिका असे एकूण ६ लाख १२ हजार ३६३ लाभार्थ्यांना याच लाभ मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील शिधा वाटप केंद्रातून आनंदाचा शिधा किटचे वाटपही गुरुवारपासून सुरु झाले आहे. त्यानुसार, ग्रामीण भागातील १ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना या किटचा लाभ होणार आहे. आतापर्यंत ६१ हजार किट प्राप्त झाले असून त्यापैकी ५७ हजार किट शिधावाटप दुकानांमध्ये पोहचले आहे. शिधावाटप दुकानांमध्ये किट पोचल्यानंतर त्याचे तातडीने वाटप सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.