बदलापूर: बदलापूर शहरातील नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचारानंतर २० ऑगस्ट रोजी ज्या बदलापूर स्थानकात तब्बल नऊ तास ऐतिहासिक असा रेल रोको झाला. त्या स्थानकात मंगळवारी सकाळी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सोमवारी मुंब्रा येथे या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर बदलापुरातील आंदोलकांनी आनंद व्यक्त केला होता. मंगळवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पेढे वाटप करण्यात आले.

बदलापुरातील चिमुकल्यांच्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली. शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला होता. २० ऑगस्ट रोजी बदलापुरात उत्स्फूर्त आंदोलन झाले. मुंबईचे लाईफ लाईन असलेली लोकल सेवा तब्बल नऊ तास ठप्प होती. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण देशभर पसरले. त्याची सर्वांना दखल घ्यावी लागली. या आंदोलनानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली होती. तर उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्याच आठवड्यात या प्रकाराचा तपास पूर्ण होऊन आरोपी अक्षय शिंदे विरुद्ध आरोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर सुनावणी सुरू होणार होती.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : पोलीस अधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडून सत्कार

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : “अक्षयचा एन्काऊंटर पोलिसांनी पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा गंभीर आरोप

अक्षय शिंदेवर दाखल करण्यात आलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्याच्या वेळी मुंब्रा बायपास जवळ पोलिसांच्या चकमकीत अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बदलापूर शहरात नागरिकांनी आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी फटाके फोडले तर काही आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. मंगळवारी सकाळी ज्या बदलापूर रेल्वे स्थानकात तब्बल नऊ तास रेल रोको आंदोलन झाले होते. त्याच स्थानकात प्रवाशांनी एकमेकांना पेढे भरवले. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रवाशांना पेढे वाटप केले. मुलींच्या प्रकरणात आरोपींना फाशी व्हावी अशी सर्वांची मागणी होती. आरोपीने स्वतः मृत्यूचा मार्ग निवडला असे सांगत मात्र यांनी चिमुकल्यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.