डोंबिवली : गणेशोत्सव काळात घरोघरी गणपतीला वाहिलेली फुले, विविध प्रकारच्या झाडांची ताडपत्री (पाने) दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते. हे निर्माल्य ठेवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याऐवजी घरगुती गणपती बसविणाऱ्या गणेश भक्तांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रद्दी पेपरांपासून तयार केलेल्या पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन विविध सामाजिक, पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेचे उपक्रम नियमित राबविणाऱ्या डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटीच्या ब्रिलियंट बटरफ्लाईज क्लब ऑफ गर्ल्स या बालिका गटातर्फे करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ वर्ष वयोगटा खालील मुली या गटात सहाभागी आहेत. गणेशोत्सव काळात गणपतीला फुले, विविध झाडांची पाने (ताडपत्री) वाहिली जाते. ही वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणून गणेश भक्त प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतात. गणपती विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य भरलेल्या प्लास्टिक पिशव्या नदी, खाडी किनारी टाकून दिल्या जातात. प्लास्टिकमुळे पिशवीतील फुलांचे निर्माल्य कुजण्याची प्रक्रिया होत नाही. प्लास्टिकमुळे ते निर्माल्य खाडी, नदीत वाहून जाते किंवा खाडी किनारी पडून राहते. या निर्माल्याचे झटपट विघटन झाले पाहिजे.

हेही वाचा : मुंबई-नाशिक महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ; वाहन चालक जखमी

गणेश भक्तांनी गणेशोत्सव काळात निर्माल्य ठेवण्यासाठी रद्दी पेपर पासून तयार केलेल्या किंवा कपड्याच्या पिशव्या वापरल्या पाहिजेत, असा विचार करुन डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी गेल्या महिन्यात फोरमच्या बालिका गटातील सदस्य मुलींना ऑनलाईन माध्यमातून रद्दी पेपर पासून कागदाच्या पिशव्या कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण दिले. आठवडाभर हे प्रशिक्षण राज्यातील विविध भागातील बालिका गटाच्या सदस्या मुली घेत होत्या.

हेही वाचा : वालधुनी नदीचा रंग झाला गुलाबी ; प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी सोडल्याचा संशय

पूर्ण प्रशिक्षित झाल्यानंतर या मुलींनी गणेशोत्सवापूर्वी रद्दी पेपर पासून कागदाच्या निर्माल्य सुस्थितीत बसेल अशा पध्दतीने पिशव्या तयार केल्या. या पिशव्या तयार करण्यासाठी मुलींच्या पालकांनी त्यांना सहकार्य केले. तयार केलेल्या पिशव्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून आपल्या घर परिसरातील घरगुती गणेश भक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फूल विक्रेते यांना वाटप कराव्यात, अशा सूचना संस्थेच्या डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी प्रशिक्षित मुलींना केल्या. त्याप्रमाणे डोंबिवली, कल्याण, रत्नागिरी, औरंगाबाद, ठाणे, पुणे भागातील बालिका गटाच्या मुलींनी स्वयंस्फूर्तिने रद्दी पेपर पासून तयार केलेल्या पिशव्या गणेश भक्त, बाजारात जाऊन फुले विक्रेते यांना वाटप केल्या आहेत.

गणेश भक्त, फूल विक्रेत्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. काही गणेश भक्त, फूल विक्रेत्यांनी या पिशव्यांच्या बदल्यात मुलींना मोबदला देण्याचा प्रयत्न केला. त्यास स्पष्ट नकार देऊन या मुलींनी ‘तुम्ही प्लास्टिक पिशव्यांचा कधीही वापर करू नका, असा निर्णय मनाने घ्या. रद्दी पेपर पासून तयार केलेल्या पिशव्या प्राधान्याने वापरा. पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावा. असे सांगून हाच आमच्या कामाचा मोबदला’ असे गणेश भक्तांना सांगितले. चिमुकल्यांनी तयार केलेल्या या कागदी पिशव्यांचे गणेश भक्त, फूल विक्रेत्यांनी, स्थानिक पालिका, ग्रामपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा : ठाण्यातील खोपट भागात घरावर झाड पडले ; दोघेजण जखमी

यावर्षी प्रथमच रद्दी पेपर पासून कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम यशस्वी झाला असल्याने, गणेश भक्तांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी जून पासून हा रद्दी पेपर पासून कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्याचा विचार आहे. यामुळे हजारो कागदी पिशव्या तयार होऊन त्याचे गणेशोत्सवापूर्वी गणेश भक्त, गणपती विक्री कारखाने, फूल विक्रेते यांना वाटप करणे शक्य होणार आहे, असे डाॅ. गाडगीळ यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावा म्हणून आमच्या संस्थेतील बालिका गटातील मुलींना ऑनलाईन पध्दतीने रद्दी पेपर पासून कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या पिशव्या मुलींनी तयार करुन गणेश भक्त, फूल विक्रेत्यांना गणेशोत्सव काळात वाटप कराव्यात असे ठरले. या उपक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षी गणेशोत्सवापूर्वी अधिकाधिक कागदी पिशव्या तयार करण्याचे नियोजन केले जाणार आहे. – डॉ . स्वाती गाडगीळ, संस्थापक अध्यक्षा , डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution paper bags nirmalya in ganeshostav dombivali tmb 01
Show comments