ठाणे : जिल्ह्यातील खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने नुकतीच तातडीने कारवाई करत २९ बालकांची सुटका केली होती. तर संस्थेत बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे प्रकार देखील यातून समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व वसतिगृह, बालगृहांचे तातडीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. शिक्षण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, अन्न नागरी पुरवठा यांच्या मदतीने जिल्ह्यात अवैध वसतीगृहाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत २९ बालकांची सुटका केली आहे. संस्थेत बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्प लाईनवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी संस्थेचे संचालक, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि त्यांना मदत करणारे दोन अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच पद्धतीने सुमारे दीड वर्षांपूर्वी नवी मुंबईतील एका अवैध वसतिगृहावर जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आली होती. यातही याच पद्धतीने संबंधित संस्थाचालकाकडून वसतिगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याची बाब उघडकीस आली होती. यानंतर आता खडवली येथील अनधिकृत संस्थेमुळे जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.