ठाणे जिल्ह्यातील नद्या वाहत्या राहण्यासाठी तसेच प्रदुषण विरहित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत कृती आराखडा तयार करण्यात यावा. नद्यांमध्ये दूषित पाणी सोडल्याने मोठया प्रमाणात प्रदूषण होते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दुषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याबरोबर दुषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपायोजना करण्याचे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
हेही वाचा >>>भिवंडीत गोवर संशयित आजाराच्या दोन मुलांचा मृत्यु; वाढत्या रुग्ण संख्येमुळे भिवंडीची आरोग्यचिंता वाढली
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नद्यांचे संवर्धन करण्यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अभियान योग्य पद्धतीने राबविण्यासाठी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात सर्व विभागांना नदी प्रदुषण रोखण्यासाठी कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ‘चला जाणूया नदीला’ या अभियानामध्ये जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी, कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी या नद्यांचा समावेश आहे. या नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच त्या वाहत्या करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. या अंतर्गत नद्यांच्या पूररेषा निश्चित करण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याबरोबरच पूररेषेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी कायदेशीर उपाय योजना करणे, नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दुषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, दुषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपाय योजना राबविण्याचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.
हेही वाचा >>>अंबरनाथः शिंदे समर्थकांच्या निकटवर्तीयांची ठाकरे गटाच्या पदााधिकाऱ्यांत वर्णी
नद्यांच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल का यासंदर्भात नियोजन करणे, पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठीही वेगवेगळे उपक्रम राबविणे, प्रदुषणासंबंधी गावातील नागरिकांचे विशेषतः महिलांची जनजागृती करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. अशा सूचनाही त्यांनी अधिकारी वर्गाला केल्या. या बैठकीला समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपवनसंरक्षक तथा समितीचे सदस्य सचिव संतोष सस्ते, सदस्य उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे डी.एम. कोकाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छाया सिसोदे, अभियानाच्या समन्वयक स्नेहल दोंदे, वसुंधरा मंडळाचे संस्थापक अनंत भागवत यांच्यासह नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात काम करणारे विविध सदस्य यावेळी उपस्थित होते.